बारामती । बारामती नगरपरिषदेच्यावतीने वाडी हद्दीतील जामदार रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम सुरू केल्यानंतर नगरपरिषदेने वरील भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता तातडीने फक्त जामदार रस्त्याचीच निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे. काम थांबल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपरिषदेने जाणीवपूर्वक असे केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराशेजारीच सातव व जामदार रोडवरील रहिवाशांनी सोमवारपासून (1 जाने.) उपोषण सुरू केले आहे. 1 जानेवारी हा नगरपालिकेचा वर्धापन दिन असून त्याचदिवशी या आंदोलनाला सुरुवात झाल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागातील लोक अन्यायाविरुध्द सातत्याने संघर्ष करीत असतात. त्यामुळे नगरपालिकेची बदनामी होत आहे. असा आकस धरून हे काम अर्धवट सोडले, असा आरोप भाजप नेते प्रशांतनाना सातव यांनी केला आहे.
पालिका सुस्त
जामदार रोडचे डांबरीकरण व पाईपलाईनचे काम बंद दीड महिन्यापासून बंद आहे. सदर काम चालू होण्याकरीता सातव यांनी 19 डिसेंबर 2017 रोजी नगरपालिकेस रितसर पत्र दिले होते. यात उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र तरीही नगरपालिका सुस्त आहे. या भागातील जवळपास 700 ते 800 लोकांचा हा प्रश्न असून नगरपालिका याकडे गांभिर्याने पाहात नाही हे स्पष्ट होत आहे. उपोषणाचा दुसरा दिवस सुरू होत असून नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे विशेष महत्त्वाचे आहे.
पालिकेचे कामकाज दबावाखाली
अवघ्या पाच-सहा महिन्यांपूर्वीच याच विषयावर जामदार रोडवरच्या रहीवाशांनी 42 दिवसाचे उपोषण केले होते. बारामती नगरपालिकेचे कामकाज हे दबावाखाली असून मनमानी पद्धतीने सुरू आहे. या मनमानी कारभाराविरुद्ध सातत्याने नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. तरीही बारामतीचे लोकप्रतिनिधी याविषयावरती मौन बाळगून असून लोकांच्या सहनशिलतेचा व संयमतेचा अंत पाहत आहेत, असे येथील उपोषणकर्त्या नागरीकांनी सांगितले. गेले दिड महिना झाले तरी सदरचे काम बंद ठेवून नागरीकांना विनाकारण त्रास देण्याचे काम नगरपालिका करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.