जामनेरजवळ भीषण अपघात : भरधाव ट्रकची इंडिगोला धडक ; भुसावळातील तिघे ठार
मयतांमध्ये नवरदेवाच्या भावासह चुलत बहिणीचा समावेश ः भुसावळातील लग्नघरी शोककळा
भुसावळ : भरधाव ट्रकने समोरून येणार्या इंडिगो वाहनाला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भुसावळातील तिघे ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जामनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या खावडी जत्रा ढाब्याजवळ घडली. अपघातानंतर इंडिगो वाहन नाल्यात कोसळले. या अपघातात नवरदेवाचा मोठा भाऊ, चुलत बहिण तसेच पार्लर काम करणारी विवाहिता ठार झाली. या अपघातानंतर भुसावळातील तुकाराम नगरातील लग्नघरी शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंगळवारी जामनेर शहराजवळ 407 वाहनाने अॅपेला धडक दिल्याने तीन प्रवासी ठार झाल्याची घटना घडली असतानाच पुन्हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
तिघांचा मृत्यू : बाळ बचावले
भरधाव ट्रकने इंडिगो कारला समोरून जबर धडक दिल्याने पंकज गोविंदा सैंदाणे (35, रा.तुकाराम नगर, भुसावळ), पार्लर चालक विवाहिता सुजाता प्रवीण हिवरे (30, त्रिमूर्ती नगर, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर नवरदेवाची चुलत बहिण प्रतिभा जगदीश सैंदाणे (30, अमळनेर) यांचा जळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला तसेच या अपघातात हर्षा पंकज सैंदाणे (30, तुकाराम नगर, भुसावळ), नेहा राजेश अग्रवाल (26, भुसावळ) या जखमी झाल्या आहेत तर हर्षा व मयत पंकज सैंदाणे यांचे दहा महिन्याचे स्पंदन नामक बाळ सुखरूप बचावले आहे.
एस आकाराच्या वळणावर अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील तुकारामनगरस्थित गोविंदा सोनवणे यांचा लहानगा मुलगा राजन याचा शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे विवाह तर गुरुवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम असल्याने भुसावळातून नवरदेवासह वर्हाडी एका वाहनाने तर नवरदेवाचा मोठा भाऊ पंकज हा पत्नी, चुलत बहिण व दोन पार्लर चालक महिलांसह इंडिगो (क्रमांक एम.एच.18 डब्ल्यू.2412) वाहनाने जामनेरमार्गे औरंगाबादकडे निघाले होते. जामनेर काही अंतरावर असतानाच एस वळणावर समोरून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रकने इंडिगोला जोरदार धडक दिल्याने इंडिगो नाल्यात कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
दहा महिन्यांचे बाळ बचावले
या अपघातात मयत पंकज गोविंदा सैंदाणे (32, भुसावळ) व हर्षा सैंदाणे (30, भुसावळ) या दाम्पत्याचे स्पंदन नामक दहा महिन्यांचे बालक बचावले आहे. पितृ प्रेमाला मात्र हे बालक मुकले असून या अपघाताने भुसावळातील तुकाराम नगरात शोककळा व्यक्त करण्यात आली. अनेक घरांमध्ये दुःखद घटनेने चुली पेटल्या नाहीत.
अपघातानंतर पोलिस अधिकार्यांची धाव
अपघाताचे वृत्त कळताचे जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केल्यानंतर जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. अपघाताला कारणीभूत ठरणारा ट्रक धडकेनंतर पसार झाला असून जामनेर व मुक्ताईनगर हद्दीत पोलिसांकडून या ट्रकचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच झाला होता अपघात
जामनेर तालुक्यात मंगळवार, 21 रोजी अॅपे रीक्षा व लाकडाची वाहतूक करणारा 407 वाहनात अपघात होवून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी अपघात होवून तिघे ठार झाल्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली.