जामनेर । शहरातील जुन्या गावात माळी गल्लीत घरात आग लागून पुर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही आग फ्रीजच्या कंप्रेसरचा स्फोट होवून लागल्याचे पिडीत कुटूंबाच्या सदस्याकडून मिळलेल्या माहीतीतून कळाली. सुदैवाने या घटनेत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. सविस्तर माहिती अशी की, जुन्या गावात असलेल्या माळी गल्ली भागात राहणारे आनंदा पंडीत माळी यांच्या घरात अचानकपणे आग लागल्याने घरात असलेल्या महिलांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतल्याने त्या बचावल्या कारण घरातील वस्तुंनी लागलीच आग पकडल्याने काही वेळातच टि.व्ही, पंखा, कपडे अशा सर्व वस्तु या आगीत जळून खाक झाल्या. घराच्या आजबाजूचा भाग दाट वस्तीचा असल्याने इतर घरानांही या आगीने विळख्यात घेवून खुप मोठे आर्थिक नुकसान व जिवीतहानी झाली असती. मात्र वेळीच या स्थानिक नागरीकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.