जामनेरात विवाहितेचा खून : आरोपी पतीला जन्मठेप

जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल : दहा हजार दंड न भरल्यास तीन महिने कारावास

भुसावळ/जामनेर : चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना जामनेर शहरातील शिक्षक कॉलनीत 3 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी जामनेर पोलिसात आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याचे कामकाज चालले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजारांचा दंड न्या.एस.डी.जगमलानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

चारीत्र्याच्या संशयातून केला होता खून
सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेरच्या शिक्षक कॉलनीतील रहिवासी असलेली विवाहिता मनीषा अनिल सपकाळे (28) हिचा आरोपी पती तथा हातमजूर असलेल्या अनिल चावदस सपकाळे (30, शिक्षक कॉलनी, जामनेर) याने धारदार शस्त्र मारून खून केला होता. या प्रकरणी मयताची आई प्रभाबाई नीना कोळी (नागणचौकी, ता.जामनेर) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अनिल सपकाळेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी 3 रोजी विवाहितेच्या डोक्यावर आरोपी पतीने हल्ला केल्यानंतर तिला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले मात्र 4 फेब्रुवारी रोजी तिची प्राणज्योत मालवली होती. यानंतर आरोपीविरोधात खुनाचे कलम वाढवण्यात आले होते तर आरोपी नेपाळमध्ये वेषांतर करून पळून जाण्याच्या प्रयत्नात तत्कालीन निरीक्षक प्रताप इंगळे व सहकार्‍यांनी त्याला जंगलातून अटक केली होती.

आरोपी विरोधात गुन्हा झाला सिद्ध
जळगाव न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रवीण टहाकळे, सुजाता भिवसने, मयताच्या बहिणीचा मुलगा जयेश तायडे, डॉ.हर्षल चांदा, डॉ.निलेश देवराज, पंच किशोर तेली, गणेश इंगळे, छायाचित्रकार नितेश पाटील, व तपासाधिकारी निरीक्षक प्रताप इंगळे यांची साक्ष नोंदवण्यात आली व ती खटल्यात महत्वपूर्ण ठरली. आरोपीविरोधात भादंवि कलम 302 सिद्ध झाल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच दहा हजारांचा दंड सुनावण्यात आला व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा न्या.एस.डी.जगमलानी यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. केस वॉच म्हणून सोनासिंग डोभळ तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार राजेंद्र सैंदाणे यांनी मदत केली.