जामनेरात सामाजिक सभागृह उद्घाटन व मूर्तीची स्थापना

0

जामनेर : भारत हा कृषी प्रधान देश असून या देशात झालेले राजे ओ.बी.सी.कुणबी होते. शिवाजी महाराज, शाहु महाराज, तथागत बुद्ध शेतकरी होते. म्हणून भारत देशाला कृषी प्रधान देशाची ओळख आहे. परंतु आजच्या सत्ताधारी यांनी ऋषी प्रधान करण्याचा घाट लावला आहे व त्यामुळे भिमा कोरेगाव सारख्या घटना घडत आहे. त्यामुळे तरूणांनी विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा जळगाव प्रभारी अविनाश निकम यांनी ढालगाव येथील दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिराच्या व ठक्कर बाबा योजनेंतर्गत सामाजिक सभागृह उद्घाटन व समाज मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. संजय पाटील व नंदलाल पवार यांना शिवाजी महाराजांच्या मूर्ती बौद्ध बांधवाकडुन भेट देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
ढालगाव दलित वस्तीत 7 लाख 50 हजार रुपयांचे तर ठक्कर बाबा योजनेतुन 20 लाख रुपये किमतीचे बांधकाम जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून मजुंर करण्यात आले व बांधकाम पूर्ण झाल्याने त्या वास्तूचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक सभागृहात तथागत बुद्ध यांच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सुशीलकुमार हिवाळे, अविनाश निकम, माणिक लोखंडे, संजय लोखंडे, शरद निकम, सतीश बिर्‍हाडे, आकाश सुरवाडे यांच्यासह बौद्ध समाज बांधव व गावकरी उपस्थित होते.

35 महिलांना गॅससंचाचे वाटप
35 महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतुन गॅस संच वाटप जे.के. चव्हाण यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. जे.के.चव्हाण,संजय पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच जिवन उगले यांनी केले. प्रभाकर जाधव, जयसिंग पाटील, कैलास काळे, विलास पाटील, पिरखाँ तडवी, बुढन तडवी, निसार तडवी, सलिम तडवी, संजय निकम, सतीश गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.