सोनगीर। तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या सोनगीर गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर ग्रामस्थांना पाण्यासाठी उपोषणही करावे लागले होते. त्याचीच दखल घेत प्रशासनाने तापी योजनेतून जामफळ धरण भरल्याने आता सोनगीरकरांचा पाणीप्रश्न किमान यावर्षापुरता तरी सुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सोनगीरकरांना किमान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्राम पंचायतीसह जिल्हा पातळीपर्यंत सातत्याने मागणी करण्यात येत होती. ग्रामपंचायत पदाधिकार्याने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देऊन तर ग्रामस्थांचे वतीने दिलीप माळी यांनी उपोषण करुन हा प्रश्न उचलून धरला होता. परिणामी, जिल्हा प्रशासनाने धुळे शहरासाठी असलेल्या तापी पाणीयोजनेतून जामफळ धरण भरण्याचा निर्णय घेतला. परिणामी, 2 मे रोजी तापी पाणी योजनेच्या पाईपलाईनद्वारे जामफळ धरणात पाणी सोडण्यात आले.
जामफळ धरण आता या पाण्याने भरले असून परिसरातील विहीरींची पाणीपातळी देखील वाढली आहे. किमान 25 ते 30 हजार नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे पाणी सोडण्यासाठी सोनगीर ग्रामपंचायतीने वीजबिला पोटी धुळे मनपाला 3 लाख 65 हजार रुपये भरले असून सलग दोन दिवस हे पाणी सोडण्यात आल्याने जामफळ धरणाची पाणीपातळी वाढली आहे. जामफळ धरणात पाणी सोडते वेळी सोनगीरचे माजी पं.स.सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, पराग देशमुख, ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे, राजेंद्र जाधव, विशाल मोरे, संदीप गुजर, राजुलाल भील, दीपक भोई, प्रेमल पाटील, शेखर परदेशी, शेखर कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.