न्यायमूर्ती गवई, न्यायमूर्ती कुलाबावाला खंडपीठाचा सुनावणीस नकार
पुणे : भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे यांचा जामीनअर्ज पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी एकबोटे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रारंभी ही याचिका न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे नेण्यात आली. तथापि, या खंडपीठाने ’नॉट बिफोर मी’ म्हणत या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे ही याचिका अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली असून, शुक्रवारी त्यावर सुनावणी ठेवली आहे. दंगलीप्रसंगी आपण घटनास्थळी नव्हतो, असा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांच्यासह संभाजी भिडे यांच्याविरुद्ध या दंगलीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
एकबोटेंविरुद्ध दोन शहरात गुन्हे दाखल
वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारीरोजी भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जात असलेल्या लोकांवर सणसवाडी येथे दीड ते दोन हजाराच्या जमावाने हिंसक हल्ला केला होता. तसेच दंगल माजवली होती. त्यात एका जणाचा मृत्यू झाला असून, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या जमावाला मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनी चिथवणी दिल्याचा आरोप आहे. त्यावरून एकबोटे यांच्याविरुद्ध पिंपरी आणि औरंगाबाद येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे दोन्ही गुन्हे नंतर शिक्रापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप एकबोटे व भिडे यांना अटक केलेली नाही.
एकबोटे म्हणतात दंगलीत सहभाग नाही!
ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, आपला झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नव्हता, असा दावा एकबोटे यांनी केला होता. तसेच, अटकपूर्व जामिनासाठी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्जही केला होता. परंतु, न्यायालयाने 22 जानेवारीरोजी एकबोटे यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एकबोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. ही याचिका न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्याकडे सुनावणीस आली असता, त्यांनी तीवर सुनावणीस नकार दिला. तसेच, एकबोटेंना दुसर्या खंडपीठाकडे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एकबोटेंच्या वकिलांनी न्यायमूर्ती धर्माधिकारी व न्यायमूर्ती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे. ही याचिका स्वीकारत या खंडपीठाने त्यावर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत एकबोटेंना अटकपूर्व संरक्षण राहणार आहे.