जाळपोळ, दगडफेक कशासाठी? नुकसान तर होतेय सर्वसामान्यांचेच!

0

‘आमच्या भावना दुखावल्या’ असे म्हणत जमाव जमतो. दहा ठिकाणची दहा डोकी एकत्र येतात. काहीतरी घोषणाबाजी सुरू होते. मग आणखी 25 डोकी जमा होतात. घोषणांचा आवाज वाढतो. पुन्हा डोक्याला डोके, डोक्याला डोके मिळत राहते आणि मुळच्या दहा डोक्यांना चेव येतो. आपल्याकडे काहीतरी अदृश्य शक्ती आहे याचा त्यांचा त्यालाच साक्षात्कार व्हायला लागतो. यातूनच प्रक्षोभकता वाढीस लागते. नंतर बाहू फुरफुरू लागतात. हाताला दगड लागतो. समोर एखादं शोरूम दिसतं. होतं खळ्ळखट्टक. आजुबाजुच्या दुकानांची शटर डाऊन होतात. डोक्यांना वाटतं आपल्या अंगी ताकद आली. आता लोकांनी आपल्याला घाबरायला हवं. मग एक मोठा दगड उचलून रस्त्या कडेला उभा असलेल्या मोटारींवर टाकायचा. लोकांची धावपळ होते…पहिला अध्याय संपला.

आता सुरू होतात प्रश्‍न. डोकी का जमली? भावना दुखावल्या म्हणजे काय? याचे उत्तर सुरूवातीला जमलेल्या दहा डोक्यांकडेही नसते. राज्याच्या कोणत्यातरी कोपर्‍यात काहीतरी घटना घडलेली असते. ती इतकी किरकोळ असते की त्या घटनेची गावापुरतीच चर्चा असते. मात्र, त्याचे पडसाद संबधीत जिल्ह्यात किंवा राज्यात उमटतात. मात्र, नेमकी काय मूळ घटना काय आहे हे कोणालाच माहित नसते. तसेच भावनांमुळे अंगाला नेमके कोठे दुखापत झाली हे पण सांगता येत नाही. अशी सगळी स्थिती.

एखाद्या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारणे ठीक. मात्र, जाळपोळ आणि दगडफेक कशासाठी? यातून आजवर काहीही साध्य झालेलं नाही. उलट सर्वसामान्य माणसाचं अमूल्य नुकसान होतं. मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो किंवा प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाची काच फोडणे किती खर्चिक पडू शकतं हे त्या श्रमजीवी घटकांना एकदा विचारून बघा. मजुर अड्ड्यांवरील मजुरांना विचारा ‘बंद’मुळे त्यांच्या घरातील चुल कशी थंड राहते. एक पोतं उचललं की दहा-वीस पैसे जमा अशी पद्धत असणारे माथाडी व त्यांचं कुटुंब त्यादिवशी उपाशीपोटं झोपलेलं असते, हे कोण कसं लक्षात घेत नाही.

भावना दुखावल्या म्हणून जमलेल्या बहुसंख्य टाळक्यांना आपला बाप दिवसभर उन्हातान्हात घाम गाळतोय आणि आई चार घरची धुणी भांडी करतेय हे लक्षातच येत नाही. अशांना नियंत्रीत करणारे डोके हुषार असते. योग्यवेळी ते पसार होते…आणि सापडतात टाळकी! कोठडीत गेलं की त्यांना समजतं आपण फसवलो गेलोय. आदेश देणारे गायब असतात व पोराच्या जामीनासाठी रोजगार बुडवून आईबाप पोलिस ठाण्यात चकरा मारत असतात. मात्र हे उमगेपर्यंत खूप उशिर झालेला असतो. अशा घटनांमुळे कारागृहात सडत पडलेल्यांची संख्या लक्षणीय आहे…मात्र लक्षात कोण घेतो. इति अध्याय समाप्त!

अविनाश म्हाकवेकर