जावेला मुलगा झाल्याच्या इर्षेतून चिमुकलीला आईनेच नदीत फेकले!

0

बोपोडी : मुलगा हवा म्हणून नवजात मुलीला मारल्याच्या घटना अधून-मधून घडतच असतात. पण, स्वत:ला पाहिला एक मुलगा असतानाही केवळ जावेला मुलगा झाला आणि आपल्याला मुलगी झाली या इर्षेपोटी आपल्या मुलीला नदीत टाकणारी एक निर्दयी आई सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना बोपोडी येथे घडली आहे. बुधवारी या आईने बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. परंतु, खडकी पोलिसांनी तिचा बनाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे.

सीसीटीव्हीने बनाव केला उघड
रेश्मा रियासत शेख (20 रा. दापोडी) असे या निर्दयी आईचे नाव आहे. बोपोडी येथे बुधवारी सकाळी रिक्षातून प्रवास करणार्‍या एका सहप्रवासी महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन तिची दहा दिवसांची मुलगी पळविल्याची घटना घडली होती. रेश्मा शेख या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात बाळाला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. परत येताना त्यांनी शेअर रिक्षा केली. रिक्षात आधीपासूनच एक महिला होती. रेश्मा शेख पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने तिचे बाळ हिसकावून रिक्षातून ती पळून गेली, अशी तक्रार रेश्मा हिने खडकी पोलिसांत दिली होती. मात्र रेश्मा हिने दिलेली माहिती संभ्रमात टाकणारी व संशयास्पद होती. कारण तिने सांगितलेल्या मार्गावरून उलट्या दिशेने रिक्षा भरधाव वेगात चालवत अपहरण करणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. पोलिसांनी त्या परिसरातील हॉटेल, दुकान यांचे सुमारे दहा सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही ठिकाणी तिच्या हातात मूल आहे तर काही ठिकाणी नव्हते. एका फुटेजमध्ये रेश्मा ही चालत आली व तिने एका दुकानांसमोर येताच अचानक आरडाओरड करत स्थानिकांना माझे मूल नेले, असा कागांवा करताना दिसत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला.

बाळ आजारी असूनही दया आली नाही
रेश्मा शेख हिने पोलिसांना सांगितले की, तिच्या जावेला काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. रेश्मा यांना एक मोठी मुलगी आहे, एक मुलगा आहे, त्यानंतर एक मुलगी झाली ती न्युमोनियाने वारली. त्यानंतर ही चिमुकली झाली. मात्र जावेला मुलगा आणि मला तिसरी मुलगी याचा राग तिच्या मनात होता. त्यातच मुलगी आजारी होती तिच्या डोळे पिवळे झाले होते व ती सतत लघवी करत होती. त्यामुळे रेश्माने तिला औंध येथील शेवाळे हॉस्पिटलमध्ये नेले व तेथेच तिला मारण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमधून निघताच बाळाला बोपोडीच्या पुलावरून नदीत फेकले. या तपासात पोलिसांनी श्‍वान पथकाची मदत घेतली असता श्‍वानांनीही बोपोडी पुलापर्यंत माग काढला. त्यामुळे अवघ्या 24 तासांत खडकी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे व पोलीस कर्मचार्‍यांनी केली.