जावे पुस्तकांच्या गावा

0

सोमवारी आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन होता. पुस्तकांची खान सहज उपलब्ध होण्याचे सोपे ठिकाण म्हणजे ग्रंथालय. महाराष्ट्राला ग्रंथालय चळवळीची मोठी परंपरा आहे. भिलारसारख्या पुस्तकांच्या गावाच्या निर्मितीचा प्रयोगही महाराष्ट्रानेच केला आहे. व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगिता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धिक विकासाचे शक्ती केंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे.

शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून ‘सार्वजनिक ग्रंथालय प्रणाली’ विकसित करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी पुस्तकांची एक लोकचळवळ असावी. मराठी एवढी समृद्ध भाषा आहे की कोणा एका दोघांना हे कार्य करता येणार नाही. यासाठी समाजातील सर्वसामान्यांचा, अभिजनांचा, लोकसंस्थांचा, शासनाचा, साहित्यिकांचा सहभाग अपेक्षित आहे. हे कार्य अखंडितपणे कित्येक वर्षे चालू शकेल एवढे मोठे आहे. तेव्हा असा सहभाग सातत्याने होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कागदी पुस्तकाचे स्वरूप बदलून ई=बुक्स, मोबाइल बुक्स किंवा ऑडियो बुक्स, असे प्रकार उदयाला आले आहेत. पण त्यांत शब्द हे माध्यम तसेच राहिले असून कागद या साधनाची जागा स्क्रीन किंवा आवाज यांनी घेतली आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात वाचनाची क्रिया तशीच राहिली आहे. मराठी पुस्तक निर्मात्यांची एक तक्रार आहे. मराठी पुस्तकाची एक हजार प्रतींची आवृत्ती संपायला किमान चार ते पाच वर्षे लागतात, असा प्रकाशकांचा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे मराठी प्रकाशकाचे भांडवलच किमान दोन वर्षे गुंतून पडते. शिवाय या पुस्तकांवर विक्रेत्यांना भरपूर कमिशन देणेही हल्ली भाग पडते. त्याखेरीज ज्या प्रमाणात या पुस्तकांची विक्री व्हावयास हवी तशी ती होत नाही.

या सार्‍यांचा परिणाम म्हणून प्रकाशकाला पुस्तकांच्या किमती अधिक ठेवण्याखेरीज गत्यंतर राहात नाही. त्याचा परिणामही पुस्तकांच्या चळवळीवर झालेला आढळतो. त्याचा विचार सर्वांनीच एकत्र येऊन करायला हवा. पुस्तक वाचन म्हणजे काय याचा थोडा ऊहापोह करायचा झाल्यास, असे म्हणता येते की, वाचन म्हणजे आकलन करून घेणे, समजून घेणे. पुस्तक-वाचनाचा सूक्ष्म विचार केल्यास, ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते हे आपल्या लक्षात येईल. लेखक त्याच्या कल्पनाशक्तीच्या व कौशल्याच्या साहाय्याने मर्यादित शब्दांच्या आधारे एक कलाकृती तयार करतो. एक प्रकारे ती कलाकृती अनुभव, माहिती आणि आकलन यांचे ‘कोडिंग’ असते. आणि वाचक वाचन करताना ते आपापल्या परीने ‘डीकोड’ करत असतो, कलाकृतीचा अर्थ समजून घेतो. हे करण्यासाठी वाचकाला शब्दांची भाषा शिकावी लागते, ती अवगत करावी लागते. वाचनाची ही अगदी प्राथमिक निकड असते. वाचताना वाचकाकडे असलेली माहिती, त्याचे अनुभव, त्याचा स्वभाव, जगणे आणि त्याची सामाजिक, आर्थिक पार्श्‍वभूमी अशा कितीतरी गोष्टींचा प्रभाव वाचन-प्रक्रियेवर पडत असतो. अशा प्रकारे पुस्तक-वाचन ही सतत सराव करून विकसित होत जाणारी क्रिया असते, ज्यात वाचकाच्या सर्जनशीलतेचा आणि विश्‍लेषण-क्षमतेचा कस लागत असतो. वाचन ही एक प्रकारे माहिती व कल्पनांची देवाणघेवाण असते. म्हणून पुस्तक हे उत्पादन इतर उत्पादनांपेक्षा वेगळे ठरते. त्याचे उपयुक्तता मूल्यही वेगळे असते.

मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले पुस्तक अन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे, असे वाटत असेल तर आता नवी कवाडे खुली झाली आहेत. त्या माध्यमातून अमराठी प्रकाशकांसाठी मराठी पुस्तकांचा डेटाबेस तयार करून दिला जाणार आहे. डेटाबेसमध्ये पुस्तकाचे नाव आणि फोटो, किंमत आणि पृष्ठे तसेच पुस्तकाचे सार, लेखकाचा प्रोफाइल असेल. तो सर्व वेबसाइटवर अपलोड केला जाईल. सदस्यत्व घेणार्‍या लेखक, प्रकाशकांनाच तो बघता येईल. त्याआधारे अमराठी प्रकाशक निर्णय घेऊ शकतात. अनुवादाच्या प्रक्रियेत सहयोगी संस्था फक्त ‘फॅसिलेटर’ म्हणून काम करेल. खरा व्यवहार फक्त लेखक आणि प्रकाशकांमध्ये होईल, तोही स्वतंत्रपणे. अनुवादित पुस्तकाच्या प्रक्रियेत लेखक आणि प्रकाशकांनी सहयोगी संस्थेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जगभरात या व्यवहारासाठी लिटररी एजंट कमिशन घेतात. हा डेटा बघून अन्य भाषांचे प्रकाशक मराठी पुस्तकांचे हक्क ऑनलाइन विकत घेऊ शकतात. मराठी-अमराठी लेखक आणि प्रकाशकांमध्ये असा अनोखा साहित्य सेतू बांधला जाणार आहे. मराठी पुस्तकांचा डेटाबेस असा कधीच तयार झालेला नाही. त्यामुळे अमराठी प्रकाशकांना तो वाचायला मिळत नाही. ज्या मराठी पुस्तकांचे हक्क इतर भाषांमध्ये विकले गेले पाहिजेत, अशा मराठी पुस्तकांचा हा डेटाबेस तयार करतोय. हा डेटा वेबसाइटवर लाइव्ह असेल. कुठलाही मराठी किंवा अमराठी प्रकाशक डेटा बघून ऑनलाइन राईट्स विकत घेऊ शकतो.

मराठीत असे अनेक ग्रंथ आहेत की जे मुद्रितावस्थेत गेलेले नाही. आज हस्तलिखितांच्या स्वरूपात ते अतिशय दुर्मीळ अवस्थेत आहेत, अशा ग्रंथांना स्कॅनिंग तंत्र वापरून ई-पुस्तकांमध्ये आणता येईल. इतिहासप्रेमी व इतिहासतज्ज्ञांचा यात मोठा हातभार लागू शकतो, अशी बरीच पुस्तके आहेत की जी आज लेखाधिकार कायद्याच्या कक्षेत आहेत, पण त्यांची आवृत्ती संपली आहे. अशा पुस्तकांचे प्रकाशन करणे परवडत नसल्याने ती मुद्रित अवस्थेत येण्याची शक्यता कमी आहे. अशा पुस्तकांचे ई-पुस्तकात रूपांतर होऊ शकते व वाचकांना ती उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय काही जणांना स्वतंत्ररीत्या नवीन ई-पुस्तक लिहावे असे वाटू शकते किंवा मुद्रित प्रकाशनाला पूरक असे ई-पुस्तकांचे प्रकाशन होऊ शकते. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. परंतु, जगाच्या नकाशावर हवा तसा ठसा उमटलेला आढळत नाही. आंतरराष्ट्रीयस्तरावर मराठी पुस्तकांचा दबदबा निर्माण व्हावा, जगभरातील भाषिकांनी हे साहित्य वाचावे, त्यांना मराठीचे आकर्षण निर्माण व्हावे म्हणून साहित्यिकांनी आणि वाचकांनी एक चळवळ उभी करण्याची गरज आहे, अशी आशा आहे की हे सर्व घडेल व मराठी पुस्तकांची निर्मिती ही चळवळ सातत्याने काम करून खूप वाचनीय पुस्तके लोकांसमोर आणेल.