मुंबई-भारताच्या इंटरनेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या आणि स्वस्त सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या रिलायन्सच्या जिओ टेलिकॉमने वर्षभरात २ कोटी अतिरिक्त ग्राहक जोडले आहेत. त्याचबरोबर जिओकडून नव्या धमाकेदार ऑफर्सची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार, जिओच्या नव्या फोनमध्ये आता फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि युट्यूब मोफत वापरता येणार आहे. हा नवा फोन १५ ऑगस्टपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. १५०० रुपयांमध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर जिओ टिव्हीकडून गीगा टिव्हीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एकाच गीगा बॉक्समध्ये व्हॉईस कमांडसह जगभरातील चॅनेल्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
देशातील अग्रगण्य उद्योग समुह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजची ४१वी सर्वसाधारण सभा मुंबईत सुरु आहे. यावेळी या उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या गुंतवणुकदारांना संबोधित केले. तसेच जिओ या टेलिकॉम व्यावसायाच्या यशाची माहिती दिली. यावेळी नीता अंबानी, अनंत अंबानी आदी उपस्थित होते.