जळगाव। चिकाटी, जिद्द व परिश्रम आपल्या जीवनाला आकार देतात. अपयश नकारात्मक व्यक्तीच्या दावणीला बांधलेले असते तर यश जगण्याला व जीवनाला आशेने जिवंतता देणार्या व्यक्तीच्या नसा-नसात सामावलेले असते. व्यक्तीला परिस्थिती हतबल करीत नाही तो स्वतः हतबल करून घेतो. खर म्हणजे, माणसातील परिश्रमाने त्याचे व्यक्तिमत्व उजळते. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून मानवतेचे कल्याण करण्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे माणसाच्या जाणीवा विकसित होतात. आपल्यातील विवेक दिव्यातील पणतीप्रमाणे तेवत राहतो. आपल्याकडे संशोधन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, फक्त ते व्यक्तिगत हिताचे नसावे तर जगत कल्याणाला समर्पित असावे. असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांनी केले.
गणेशत्सवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मूळजी जेठा महाविद्यालय संचलित मुलांचे वसतिगृह आणि मुलींचे (शहर) वसतिगृह यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सवा दरम्यान ‘ चैतन्याची मांदियाळी ’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत प्रसिद्ध व प्रेरणादायी व्यक्तीची मुलाखत विद्यार्थी स्वतः घेतात. यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या वसतिगृहातील सागर नाईक आणि मुलींच्या शहर वसतिगृहातील कु.रूपाली राजपूत या दोघांनी माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांना त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनाविषयी विविध प्रश्न विचारलेत.
ध्येयासाठी प्रयत्नशील रहा
त्यांना विचारलेल्या उत्तरांमध्ये वैयक्तिक जीवनाविषयी त्यांनी सांगितले की, साधी राहणी, निर्व्यसनी जीवन, कामातील व जगण्यातील प्रामाणिकपणा,सतत कामात व्यस्त आणि यामुळे मिळालेले समाधान महत्वाचे आहे. आज वयाची पंच्यात्तरी ओलांडली तरी मला प्रयोगशाळेत जावून संशोधन करण्यात आनंद वाटतो. आपल्या बोलण्यातून माळी सरांनी आजच्या युवापिढीला ध्येयासाठी प्रयत्नशील राहा. कोणी सांगितले म्हणून मी हे केले असे न करता, मला आवडते म्हणून मी ते केले असे माना. तुमच्या कामात प्रसन्नता अनुभवा, जे ही कार्य हाती घ्याल, जी संधी तुम्हाला मिळेल त्याच सोन करा, आई-वडील, गुरु-मार्गदर्शक यांच्या वर विश्वास ठेवा, असा मोलाचा संदेश दिला.
या विषयावर मार्गदर्शन
मू.जे.चे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ध्येयनिष्ठ आणि कर्मशील जीवन कस जगाव आणि त्यातून आपले भविष्य व व्यक्तिमत्व कसे घडविता येते याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभाला मू.जे.च्या शहर वसतिगृहातील विद्यार्थींनी मिळून ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ प्रार्थना म्हटली. प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख प्रा.विजय लोहार यांनी केले आहे. कार्यक्रमाला प्रा.सहदेव जाधव, प्रा.दीनानाथ पाठक, प्रा.अमोल बाविस्कर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.