जिमखान्याऐवजी महापौर बंगला उभारा

0

मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या महालक्ष्मी येथील मोडकळीस आलेल्या दोन इमारती पाडून अधिकार्‍यांसाठी जिमखाना उभारण्यात येणार आहे. अधिकार्‍यांसाठी जिमखाना जरुरी नसून महापौरांना पर्यायी बंगला जरुरी असल्याचे सांगत भाजपने आज स्थायी समिती सभेत राजकीय खेळी खेळून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपाच्या खेळीला बळी न पडता जिमखान्याचा प्रस्ताव मंजूर केला. सदर प्रस्ताव मजूर केल्याने भाजपने सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.

जिमखाना पर्याय ठेवा
महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत येणार्‍या महालक्ष्मी येथील केशव खाडे मार्गावर नगर भूमापन क्रमांक 47/6 वर पालिकेच्या दोन इमारती आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून या इमारती पाडून त्या भूखंडावर अधिकार्‍यांसाठी जिमखाना उभारला जाणार आहे.
या कामासाठी पालिकेच्या दोन मोडकळीस आलेल्या इमारती पाडल्या जाणार आहेत. यासाठी लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी कंत्राटदाराला 48 कोटी 75 लाख 24 हजार 784 रुपये इतकी रक्कम अदा केली जाणार आहे.

भाजपला दराडेंचा पुळका
भाजपाने पालिका अधिकार्‍यांच्या जिमखान्यास विरोध करताना महापौरांच्या बंगल्याची ढाल करणे चुकीची असून शासकीय अधिकारी असलेल्या दराडे दाम्पत्याना पालिकेच्या बंगल्यातून निष्कासित करावे लागू नये म्हणून हा बनाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या एका नेत्याने केला. भाजपाला महापौर बंगल्याची एवढीच काळजी असेल तर त्यांनी दराडे यांच्या ताब्यातील पालिकेचा बंगला महापौरांसाठी रिक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असा टोला त्यांनी लगावला.

…तर आरक्षणही बदलावे लागणार
1 महापौर बंगल्यासाठी हा भूखंड योग्य असून या ठिकाणी पश्‍चिम, पूर्व आणि शहरातील नागरिक व नगरसेवकांना पोहोचणे सहज शक्य असल्याचे कोटक यांनी सांगितले. तर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या भूखंडांवरील आरक्षण कधी बदलण्यात आले, प्रशासकीय मंजुरी कधी घेतली, असे प्रश्‍न उपस्थित केले.
215 महिन्यांपूर्वी पुरंदरे स्टेडियमच्या प्रस्तावाला तर एप्रिल महिन्यात तीन जलतरण तलावांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने भूखंडाचे आरक्षण बदलून जिमखाना बांधू नये, अशी मागणी शिंदे यांनी केली. तर मकरंद नार्वेकर यांनी या भूखंडावर जिमखाना उभारला जावा का याबाबत लोकांचे मत मागवावे अशी मागणी केली.

3 जिमखाना बांधावयाचा असल्यास या भूखंडाचे आरक्षण बदलावे लागणार आहे तसेच सीआरझेडबाबतही मंजुरी घ्यावी लागणार आहे. यामुळे सध्या प्रस्तावात दाखवण्यात आलेल्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याने त्याला भाजपने विरोध केला तसेच स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे मतदान घेण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली. दरम्यान, यावेळी मतदान घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने जिमखान्याच्या हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. यामुळे संतापलेल्या भाजप सदस्यांनी सभात्याग केला.