जळगाव:जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोनाबाधित म्हणून दाखल झालेली महिला बेपत्ता होते आणि पाच दिवसानंतर तिचा कुजलेला मृतदेह वॉर्ड क्रमांक 7 मधील बाथरूममध्ये आढळून येतो. या प्रकारामुळे कोविड रुग्णालयातील व्यवस्थाप, प्रशासनाचा कारभार उघडा पडला असला, तरी अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने याची उत्तरे जनतेला द्यायला हवीत.
1) उपचारासाठी दाखल झालेली कोरोनाबाधित वृद्ध महिला ही बाथरूमला गेली होती. त्यानंतर ती गायब झाली. ही महिला नेमकी गेली कुठे होती?
2) रुग्ण बाथरूममध्येच अडकला आहे का? याचा कुणीही शोध का घेतला नाही?
3) सहा दिवसानंतर या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाथरूममध्येच आढळून आला. तब्बल सहा दिवस हे बाथरूम कुणीच कसे उघडले नाही?
4) सहा दिवस बाथरूमची स्वच्छतादेखील केली गेली नाही का?
5) जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे नोडल अधिकारी म्हणूनही काम पाहत आहे. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यावरही जिल्ह्याची जबाबदारी आहेच. कोरोना काळात जिल्हा रूग्णालयात असे प्रकार घडतातच कसे?
6) जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रूग्णांची नेमकी स्थिती काय असते? याचा आढावा घेतला जातो की नाही?
7) एक कोरोनाबाधित महिला बेपत्ता होते, सहा दिवसानंतर तिचा मृतदेह रूग्णालयातच आढळतो हे यंत्रणा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे अपयश नाही का?