जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून भरवला गुरांचा बाजार

लंपीचे रोगाचे सावट तरीही नाही गांभीर्य : नगरपरीषद कर्मचार्‍यांसह पोलिसांनी धाव घेतल्यानंतर दलालांनी गुंडाळला बाजार

A Cattle Market Was Held in Warangaon Against the Orders Of The Collector वरणगाव : गुरांवर आलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी गुरांचा बाजार भरवण्यास मनाई केली आहे मात्र आदेश धुडकावून शहरात सोमवारी म्हशींचा नियमबाह्य बाजार भरवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांची वेळीच धाव
गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शासनाच्या वतीने आजार नियत्रंणासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे तसेच या आजारावर नियंत्रणासाठी गुरांच्या बाजारावर तसेच वाहतुकीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी बंदी घातली आहे. या प्रकारचे आदेश संबधीत बाजार समिती, नगरपरीषद व ग्रामपंचायतीला दिले आहेत मात्र वरणगावातील प्रसिद्ध सोमवारचा म्हशींचा बाजार दलालांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धुडकावून भरवला. जुन्या महामार्गावरील हिना पार्क येथे हा बाजार भरवण्यात आल्याची कुणकुण लागताच नगरपरीषदेच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली मात्र बाजार बंद करण्यात ते अयशस्वी ठरल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. काही वेळाने दलालांनी बाजार आटोपता घेतला.