जिल्हाधिकार्‍यांकडून पाटचारी साफसफाईची पाहणी

0

शहादा। शहादा ते प्रकाशारोड जवळ असणार्‍या साईबाबा मंदिरापासुन काही अंतरावर सॉ मिलच्या व्यावसायिकाचे काळे पाणी पाटचारीत व लगतच्या मोकळ्या जागेत सोडले जाते.त्यामुळे जवळच्या रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पाटचारी साफ सफाईची पाहणी नुकतीच केली. त्यावेळी त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यानी मिल प्रदूषण परवाना व इतर दस्तावेज तपासणीचे आदेश प्रांताधिकार्याना दिले आहेत.

मिलच्या दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात
आनंदनगर, स्वामी विवेकानंद नगर या भागातील रहिवाश्यांचे या मिलच्या दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात आले आहे रहिवाश्यांनी ह्या बाबतीत तक्रारी केल्या होत्या. पाट्बंधारे विभागाच्या पाटचारीस अनेकांनी आपल्या घराचे सांडपाणी शौचालयाचे पाणी, उद्योग व्यवसायाचे पाणी सोडल्याने या परिसरातील कूपनलिकेच्या पाण्याच्या रंग बदलत चालला आहे.पाटचारीच्या 200 फुटावर आदिवासी आश्रम शाळा आहे. येथे बरेच विद्यार्थी शिक्षण घेतात,या दुषीत पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परीणाम भविष्यात होण्याची भिती नाकारता येत नाही.

अहवाल पाठविण्याचे प्रांताधिकार्‍यांना आदेश
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यानी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रांताधिकारी याना दिले. भगवती सॉ मील गत दोन वर्षापासून सुरु आहे या मिलला पर्यावरण विभागाने प्रदूषणाबाबत परवानगी दिली का? पर्यावरण विभागासोबतच पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असुन प्रांताधिकारी साताळकर यांनी नि:पक्ष चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकानी यावेळी व्यक्त केली.

दुर्गंधी युक्त पाणी पाटचारीत
भगवती सॉ मिलच्या ठिकाणी होणार्‍या उद्योगासाठी पाण्याचा वापर होतो ते पाणी शेवटी ऑईल सारखे काळेभोर पाणी पाईपलाईन द्वारे पाटचारीत सोडले जाते. काही पाणी लगतच्या प्लॉट मधे सोडले जाते.त्यामुळे दुर्गंधी तर येतेच मात्र नागरिकाचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. संबंधित सॉ मिलचे काळेभोर पाणी धो धो पाटचारीत जात असल्याचे स्वत: जिल्हाधिकारी डॉ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, तहसील मनोज खैरनार, मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी पहाणी केली