जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर 12 बोगस डॉक्टरांवर कारवाई

0

धुळे- जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायिकाविरुध्द आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विशेष मोहिम राबवून जिल्हा आरोग्य विभागाने 12 बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमणात बोगस डॉक्टर आहेत. दुर्गम व ग्रामीण भागात त्यांचा व्यवसाय सुरु आहे.

बोगस डॉक्टर शोधण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यासाठी पथक तयार केले आहे. पथकात अध्यक्ष गटविकास अधिकारी, तर सदस्य म्हणून सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र आतापर्यंत चारही तालुक्यातील एकाही गटविकास अधिकार्‍यांने बोगस डॉक्टर शोधला नाही. कारवाई फक्त आरोग्य विभागानेच केलेली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर आहेत. त्यांची संख्या 110 असल्याची माहिती समोर आली आहे. ह्या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना बिनधास्तपणे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनात बोगस डॉक्टरांविरुध्द मोहिम सुरु करुन कारवाई केली जात आहे. धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील फक्त 12 डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोगस डॉक्टरांविरुध्द धडक मोहिम सुरु केल्याने अनेक बोगस डॉक्टरांनी गाधा गुंडाळला आहे. जिल्ह्यातील जवळपास 30 जणांनी आम्ही वैद्यकीय व्यवसाय बंद केला असल्याचे लेखी स्वरुपात कळविले आहे. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांमध्ये बंगालींचे प्रमाण जास्त होते.