जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर भुसावळ विभागात रेमडीसीव्हर संदर्भात झाडाझडती

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर भुसावळ विभागात मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीने खळबळ

रावेर : जिल्ह्यात रेमडेसीव्हरच इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्यच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश देताच भुसावळसह रावेर शहरातील औषध दुकानांची तहसीलदारांच्या पथकाने तपासणी केल्याने खळबळ उडाली. प्राप्त साठा, विक्री झालेला साठा, बिलांची पथकाकडून तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडून उशिराने का असेना पावले उचलण्यात आल्याने या कारवाईचे स्वागत होत आहे.

सावद्यासह रावेरात उडाली खळबळ
जिल्हाभरात रेमडीसीव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्यापर्यंत आल्या होत्या. यानंतर नंतर शुक्रवारी रेमडीसीवीरचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईचे आदेश काढण्यात आल्यानंतर स्थानिक महसूल प्रशासन खळबडून जागी झाले व सावद्यासह रावेरच्या 19 मेडीकलची तपासणी करण्यात आली. यापैकी वल्लभ मेडिकल यांच्याकडे 12 रेमडीसीवीर स्टॉक उपलब्ध आहे. सर्व महत्त्वाच्या दुकानांची तपासणी करून रेमडीसीव्हरचा किती स्टॉक आहे याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली. यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना साठा घेण्यासाठी कार्यान्वित करून माहिती प्राप्त करून घेण्यात आली.

भुसावळातही तपासणी मोहिम
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार दीपक धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांनी शहरातील आठ ते दहा औषध दुकानांमध्ये रेमडेसीव्हर इंजेक्शनचा साठा, विक्री झालेला साठा तसेच त्याबाबत जोडण्यात आलेल्या बिलांची खातरजमा करून त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला.

नियमानुसार साठा : राजाभाऊ काबरा
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शहरातील प्रशासनाने रेमडेसीव्हरचा साठा तपासला. त्यात मागवलेला माल, विक्री झालेला माल व शिल्लक साठा यांची तपासणी करण्यात आली मात्र सर्व साठा नियमानुसार असल्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ काबरा म्हणाले.