धुळे । जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये चांगले विचार रुजविण्यासह चांगली वागणुक, सदगुणांचा सहवास अशा विषयांवर नैतिक प्रबोधन करण्यासह त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे करण्यात आले. यात प्रामुख्याने जिल्हा कारागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती व जागतीक तंबाखु विरोधी दिनानिमित्त कारागृहातील बंद्यांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय, उडाणे येथील प्रा.विजय पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य या विषयी मार्गदर्शन केले, तर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील श्री.बागुल यांनी तंबाखुमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कैद्यांना राजयोग, ध्यानधारणेचे मार्गदर्शन
कारागृह अधिक्षक व्ही.एस.आगे यांनी अहिल्याबाई होळकरांचे जीवनकार्यच्या माहितीसह व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याबाबत आवाहन केले. त्याच प्रमाणे कैद्यांसाठी नैतिक प्रबोधनपर प्रवचन देत प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, धुळे येथील प्रमिला दिदी यांनी त्यांच्या संस्थेचे कार्य सांगून राजयोग, मेडीटेशन यांचा या क्रियांबाबत मार्गदर्शन केले. तर या नैतिक प्रबोधनाच्या सात दिवसीय शिबीरात कैद्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कारागृह अधिक्षक श्री.आगे यांनी केले.
248 कैद्यांची नेत्र तपासणी
जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी समता मेमोरीयल फाऊंडेशन, मुंबई व जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात समता मेमोरीयल फाऊंडेशन, मुंबई यांचेकडील अधिकारी श्री.देवरे, श्री.सोलंकी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.आर.पी.पाटील, डॉ.शशिकांत शिंपी, डॉ.गुणवंत बिर्हाडे यांचे मार्फत दवाखाना, सर्कल व महिला विभागातील एकुण 235 पुरूष व 13 महिला कैद्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
नैतिक प्रबोधन शिबीर
यावेळी डोळ्यांची निगा व काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा कारागृहातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमास कारागृह अधिक्षक व्ही.एस.आगे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी बी.डी.श्रीराव, श्रीमती डी.व्ही.आगे, तुरूंगाधिकारी आर.बी.नरोड, शिक्षक एच.एस.पोतदार यांच्यासह कैदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे नैतिक प्रबोधनाचे सात दिवसांचे शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.