जिल्हा नियोजन समिती बैठकीचे ग्रहण अखेर सुटले

0

जळगाव । मागील वर्षभरात जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनेक ग्रहण लागल्याचे दिसुन आले आहे. मागील एका वर्षात तिनदा जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला गेला. त्यामुळे 2016-17 या वर्षात फक्त एकदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक होवू शकली. माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना फेबु्रवारीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती.

मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पालकमंत्रीपदासाठी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अखेर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर फुंडकर यांनी गेले काही दिवस नियोजन समितीची बैठक घेतली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यांच्या नियुक्तीने 9 नोव्हेंबर 2016 रोजी तब्बल नऊ महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. फुंडकर यांच्यानंतर महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यांनी निवडणीनंतर लगेचच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचे ठरविले. मात्र बैठकीच्या दिवशी विधानपरिषदेची आचारसंहिता लागु झाल्याने बैठक रद्द करण्यात आली. बैठकीसाठी ते शहरात दाखल देखील झाले मात्र बैठक रद्द झाल्याने त्यांना माघारी जावे लागले. 23 फेबु्रवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार असल्याने अखेर जिल्हा नियोजन समितीचे ग्रहण सुटले असुन शनिवारी 25 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री अध्यक्षस्थानी असतील.