धुळे । जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांमार्फत अर्थसंकल्पात मंजूरी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या या सभेत अजेंड्यावर एकूण 12 विषय मंजूरीसाठी घेण्यात आले. या सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, ग्राम पंचायत विभाग आदी विभागातील विषयांवर यावेळीविशेष चर्चा करण्यात आली. धुळे जिल्हा परिषदेच्या 2017-18 चे शिल्लकी अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. जिल्हाभरात विविध विकास कामे करून तब्बल 961.18 लाखांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर 2018-19 या वर्षासाठी विविध विभागांना आवश्यक असलेल्या निधीसाठी 903.39 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला.
पशुपालक उन्नती योजनेच्या निधीसाठी प्रस्ताव
यात सन 2017-18 या वर्षाकरीता नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत पशुपालक उन्नती योजना मिल्कींग मशीन, खवा मशीन, पॅकींग मशीन पुरवठा करणे, पशुसंजीवनी अॅप तयार करणे व आदर्श पशुपालक पुरस्कार प्रदान करणे योजनेसाठी जि.प.सेस फंडामधुन योजना राबविण्यास मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मानव विकास योजना सन 2017-18 अंतर्गत कुटुंब कल्याण साहित्य सामुग्री खरेदी साठी 71 कोटी 48 लाख एवढ्या रक्कमे तत्वता मान्यता प्रदान करण्यात यावी याकरीता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
धुळे जि.प.च्या झालेल्या या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, कृषी सभापती लीलाबाई बेडसे, शिक्षण सभापती नूतन पाटील,कामराज निकम, अॅड.ज्ञानेश्वर एखंडे, डॉ.तुळशीराम गावीत, प्रा.संजय पाटील, के.डी.पाटील यांच्यासह विविध विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी, सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वाढीव उपकरास मुदतवाढ
जिल्हाभरातील 33 अंगणवाड्यांसाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पशुसंवर्धनासाठी सेस फंडातून योजना राबवावी, कुटुंब कल्याण साहीत्य सामुग्री खरेदी प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, जि.प.निर्मीतपदांना प्रशासकीय मंजूरी मिळावी,जमीन महसुलावरील वाढीव उपकरास पुढील 5 वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी,शिंदखेडा पंचायत समिती येथ ील धोकादायक इमारती पाडणेबाबत तसेच प्रा.आरोग्य केंद्र नवापाडा व प्रा.आरोग्य केंद्र दुसाणे ता.साक्री येथील मोडकळीस आलेले धोकादायक झालेली इमारत बांधकाम पाडण्यास जि.प.सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळावी आदी विषयांवर प्रस्ताव आले.
न्यायलयीन प्रकरणांसाठी विधी कक्षाची स्थापना
निमडाळे ते वार या रस्त्यांसाठी 55 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर प्रस्ताव हा 50 लाखांच्या वर असल्यामुळे पुढील कामास प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे असल्यामुळे हा विषय बांधकाम समितीतर्फे सभागृहासमोर मांडण्यात आला. या व्यतिरिक्त धुळे जिल्हा परिषदेच्या न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहण्याकरीता विधी कक्षाची स्थापना करणे व करार पध्दतीने अधिकार्यांची तात्पुरती नियुक्ती व मानधन निश्चीत करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सेस फंडातून 20 लाखांचा निधी
2017-18 अंतर्गत प्राप्त झालेल्या तरतुदीमधुन जिल्ह्यातील 7 अंगणवाडी इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकीय खर्च 49 लाख 50 हजार रूपये मंजुर करण्यात यावे तर 33 अंगणवाडी इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकीय खर्च 2 कोटी रूपयांना प्रशासकीय मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर अंगणवाडी इमारत बांधकामासाठी यापुर्वीच निधी वितरीत करण्यात आल्याचे व 33 अंगणवाड्यांचा प्रस्ताव मंजुरीस देण्यात आला असल्याचे जि.प. अध्यक्षांनी यावेळी सांगितले. पशुपालक उन्नती योजनेसाठी सेस फंडातून 20 लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजूरी मिळावी याकरीता हा विषय सभागृहासमोर मांडण्यात आला.