जळगाव : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पंचवार्षीकची ही शेवटची सर्वसाधारण सभा असल्याने या सभकडे सर्वाचे लक्ष लागुन होते. ही सभा वादळी ठरणार अशी चिन्हे आधीपासूनच होती. दरम्यान विविध विषयांवर अधिकार्यांकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्याने सदस्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले व यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. अजेंड्यावरील विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर सदस्यांनी या विषयांवर हरकत घेतल्याने चांगलाच वाद उध्दभवला. सर्वसाधारण सभेतील अजेंड्यात आरोग्य विभासाठी दोन कोटीपेक्षा जास्त निधींची तरतूद करण्यात आले होते. या निधीतून आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारती, नवीन इमारतीचे बांधकाम, औषध खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येणार होते. जीर्ण झालेल्या आरोग्य केंद्राची इमारत पाडणे, नवीन बांधकाम करणे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना यासह अंगणवाडी सेविकांच्या मुद्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे समोर आल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले.
सीईओंची अधिकार्यांना तंबी
अपुर्या विकास कामांबाबत जि.प.सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकार्यांनी सदस्यांना नियम दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा जि.प.सिईओं अस्तिककुमार पांण्डेय यांनी अधिकार्यांना जास्त नियम न दाखविता फक्त विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे असा सज्जड दम दिला. तसेच तुमच्याकडे असलेल्या कामांवर जास्त लक्ष देण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत देखील असाच प्रकार केल्याने असे प्रकार बंद करा असे आदेश दिले.
आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सर्वाधिक निधीची तरतूद आरोग्य विभागासाठी करण्याचा विषय अजेंड्यात नोंदविण्यात आले होते. परंतु मागील काही वर्षापासून आरोग्य विभागासाठी देण्यात आलेली निधीच पुर्ण खर्च करण्यात न आल्याने काही आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले आहे. खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी तीन वर्षापासून 80 लाख रुपये मंजुर करण्यात आलेले होते परंतु हा निधी पुर्ण खर्च केला गेला नसुन बांधकाम देखील अपुरे आहे. अशीच स्थिती अमडदे, मांडवे दिगर, सावखेडा होळ, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. याबाबत जि.प.सदस्यांनी आरोग्य अधिकार्यास विचारणा केली असता. त्यांनी फक्त अखर्चीत निधी बाबत सांगितले. मात्र कुठल्याच प्रकारचा खुलासा दिला नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
आठ महिन्यापासून मनरेगाचे मानधन नाही
बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथे नालाखोलीकरणाचे काम मनरेगा अंतर्गत करण्यात आले. परंतु मागील आठ महिन्यापासून मनरेगा अंतर्गत काम करणार्या कामगारांन मानधन दिले गेले नसल्याचे जि.प.सदस्य उद्धव मराठे यांनी निदर्शनात आणून दिले. त्यानंतर संबंधीत अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.
शेवटच्या सभेत सदस्यांच्या झोपेच्या डुलक्या
या पंचवार्षीकची शेवटची सभा असल्याने त्याला विशेष महत्त्व होते. परंतु काही जि.प.सदस्यांनी सभेत जास्त रस न दाखविता झोपा काढणेच पसंत केले. अजेंड्यावरच्या विषयांना विषयांतर होत असल्याने सदस्य निरुस्ताही दिसून आले.
अंगणवाडी सेविकांची नियुक्ती नाही
मुक्ताईनगर तालुक्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका पदावर चार महिन्यापूर्वी अंगणवाडी सेविकांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्यापही त्यांना रुजु करण्यात आले नसल्याचा प्रश्न जि.प.सदस्य अशोक कांडेलकर यांनी उपस्थित केला. नियुक्ती करण्यात होत असलेल्या विलंबाबत विचारल्यास यावर महिला व बालविकास अधिकार्यांनी अनभिज्ञता दर्शविली ही जबाबदारी तालुका स्तरावरील महिला व बालविकास अधिकार्यांची असल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत चौकशी करतो असे सांगितले.