जळगाव । जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत असलेले जळगाव पंचायत समितीचे कार्यालय शिवतीर्थ मैदानाजवळील विद्यानिकेतन शेजारील डाएटच्या जागेवर सहा महिन्यापूर्वी स्थलांतर करण्यात आले. पंचायत समिती स्थलांतरनानंतर जिल्हा परिषदेतील या जागेवर छोटे विभाग स्थलांतरीत करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. मात्र, सहा महिने उलटूनही याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे जागा वापराविना पडून आहेत. जिल्हा परिषदेतील काही विभाग अडगळीच्या खोलीत आहेत. पुरेशा जागेअभावी तेथील कर्मचार्यांना काम करण्यास अडचण होते. यात वेतन पथक, भविष्य निर्वाह विभागासह इतर विभाग हलविले जाणार होते. इमारतीस नुकतीच रंगरंगोटीसह दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. नुकतेच मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून आलेले कौस्तुभ दिवेगावकर यांनी पदभार स्विकारताच सुरक्षारक्षकांची नेमणुक केली. पार्किंगसाठीही स्वतंत्र जागा तयार केली आहे. मात्र, नियोजित कार्यालये अजूनही हलवण्यात आलेली नसल्याने जागा अद्यापही रिकामी आहे