जिल्हा परिषद करणार पशुपालकांना 50 टक्के अनुदानावर साहित्य पुरवठा

0

पुणे । जिल्ह्यातील पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना 50 टक्के अनुदानावर उपयुक्त साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचा फायदा पशुपालकांना होणार असून, यामध्ये कडबा-कुट्टी यंत्रासह मुक्त संचार गोठा, खाद्य आणि पाणी पिण्यासाठी गव्हाणीचा पुरवठा करण्यात येणार आहे.

लाखांचे अनुदान
जिल्हा परिषद निधीच्या 2017-18 मध्ये पशुपालकांना 75 टक्के अनुदानावर उपयुक्त साहित्य पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी 93.33 लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये कडबा-कुट्टी यंत्रासाठी 66.66 लाख, मुक्त संचार गोठा आणि गव्हाणीचा पुरवठा याची 26.67 लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.

लाभासाठी दहा जनावरे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकाजवळ स्वत:ची लहान मोठी किमान दहा जनावरे असणे आवश्यक आहे. तर महिला शेतकरी लाभार्थ्याकडे पाच जनावरे असावीत. लाभार्थीकडे विद्युत पुरवठा पाहिजे, लाभार्थीमध्ये 33 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे. पात्र महिला लाभार्थी न मिळाल्यास पुरूष लाभार्थींना लाभ देण्यात यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखाची शिफारस आवश्यक आहे.

कुक्कुटपालना साठी 83 लाखांची तरतूद
जिल्ह्यातील भूमिहीन शेतमजूर, मागसवर्गीय, अत्यल्प भुधारक यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने कुक्कुटपालन ही योजना सुरू केली आहे. या योजनेला नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, योजनेसाठी 83.33 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पशुपालकांना या योजनेअंतर्गत कडकनाथ कोंबड्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थ्याला सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमातीच्या प्राधान्यक्रमानुसार अनुदान देण्यात येणार आहे.