जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता ‘कर्मचारी हित सप्ताह’

0

पुणे । जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्या कोणाकडे मांडायच्या, त्याचे निरसन होईल का? असे प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे राहतात. कर्मचार्‍यांचे हे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी हित सप्ताहचे आयोजन करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा सप्ताह घेण्यात येणार असून, त्यामध्ये कर्मचार्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नांचे निरसन केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कार्यवाहीचा अहवाल बंधनकारक
नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवसांपासून कर्मचारी आपल्या तक्रारी व प्रलंबित प्रश्‍नांसाठी थेट अर्ज करू शकतील, अशी सोय करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांनी केलेले अर्ज, तक्रारी त्याच दिवशी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असून त्या अर्जावर एका आठवड्यात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्रलंबित प्रकरणे व तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा गोषवारा ई मेलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दर सोमवारी पाठविणे प्रत्येक खातेप्रमुखांवर बंधनकारक असणार आहे.

कर्मचार्‍यांच्या हितासाठी उपक्रम
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर्मचारी वर्गाच्या हितासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून, त्याचे कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभागासह इतर अनेक विभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील 13 पंचायत समित्या असे मोठे कार्यक्षेत्र असणारी पुणे जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. कार्यालयात काम करत असताना त्यांना छोट्या-मोठ्या अडचणींचा येत असतात. मात्र, त्याबाबत कोणाकडे प्रश्‍न उपस्थित करायचा याबाबत कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था असते. त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या कामावर होत असतो.

कर्मचारी तक्रार निवारण दिन
कर्मचार्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे वेळीच निरसन होऊन काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कर्मचारी हित सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार आहेत. तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी तक्रार निवारण दिन आणि कर्मचार्‍यांना आपल्या तक्रारी किंवा प्रलंबित प्रश्‍न थेट वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचवता यावेत याकरीता विशेष ई-मेल या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

हित सप्ताह फेब्रुवारीत
कर्मचारी हितसप्ताह साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर कर्मचारी तक्रार निवारण दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या अथवा दुसर्‍या सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे.
– सूरज मांढरे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद