इनरव्हीलने राबविला उपक्रम
वडगाव मावळः मावळ तालुक्यातील कुसगावमधील जिल्हा परिषद शाळा इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या मदतीने हॅप्पी स्कूल बनविण्यात आली आहे. क्लबच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या उपयोगी येणारे साहित्य देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासाचे वातावरण पूर्वीपेक्षा चांगले झाले असून ही शाळा आता हॅप्पी स्कूल म्हणून ओळखली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर कुसगाव आहे. पुणे-मुंबई महामार्गापासून जरा दूर असलेले गाव निसर्गसंपन्न आहे. गावाप्रमाणेच गावातील शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने ही शाळा नुकतीच हैप्पी स्कूल म्हणून घोषित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्षा रेणू मित्रा, खजिनदार निर्मल कौर, सदस्य कमलजित डुल्लत, हरबिंदर डुल्लत आदी उपस्थित होते.
शाळेने राखली गुणवत्ता
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा म्हणाल्या की, प्राथमिक शाळा हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. हाच संकल्प घेऊन इनरव्हील क्लब आॅफ निगडी प्राईडने कुसगावातील शाळा हॅप्पी स्कूल करण्याचा निर्णय घेतला. शाळेला उपयोगी साहित्य देण्यात आले. यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमुलाग्र बदल होणार आहे. खुर्च्या, व्हाईट बोर्ड, ग्रंथालयातील कपाटे, वह्या, क्रीडा साहित्य, हॅन्ड
वॉश सिस्टम अशा प्रकारचे साहित्य देण्यात आले. शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द याच्या जोरावर शाळा आपली गुणवत्ता राखून आहे.