जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारेंनी जाणल्या समस्या

0

मांडवेदिगर शाळेला भेट : सरपंचानी केली शाळेला संरक्षण भिंतींची मागणी

भुसावळ- तालुक्यातील मांडवे दिगर येथे जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी अचानक भेट देऊन गावातील व जिल्हा परीषद शाळांची समस्या जाणून घेतली. यावेळी जिल्हा परीषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्याची तसेच शाळा खोलीची ागणी सरपंच द्वारकाबाई दरबार जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केली. सावकारे यांनी ग्रामपंचायतीलाही भेट दिली. त्यांच्यासोबत रेणुका रंगलाल पवार यांचीही उपस्थिती होती .

सत्कार व शाळा खोलीबाबत चर्चा
सरपंच द्वारकाबाई जाधव, उपसरपंच इंदुबाई देविदास, रोहिदास पवार, माजी सरपंच गोपी पवार आदींनी सावकारे यांचे स्वागत केले. जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी दीड तास जिल्हा परीषद शाळेत थांबून शाळेची पाहणी केली. जिल्हा परीषद शाळेमध्ये पत्रांच्या केवळ दोन खोल्या व एक बांधकाम केलेली खोली आहे. त्यातील पत्र्याच्या दोन्ही खोल्यांना गळती लागत असल्याचे दिसून आले तर येथील विद्यार्थी पटसंख्या पाहता येथे खोल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास सरपंच- उपसरपंच व ग्रामस्थांनी आणून दिले. त्यानंतर त्यांनी भिलमळी तांडा येथेही भेट दिली. येथेही शाळेला संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली. जिल्हा परीषद शाळेमध्ये सावकारे यांचा सत्कार मुख्याध्यापक व उपशिक्षक रवी पढार यांनी केला.

गटारीचे काम रद्द केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
जिल्हा परीषद निवडणुकीपूर्वी येथे गटारींचे काम मंजूर करण्यात आले मात्र हे काम जिल्हा परीषद निवडणुकीनंतर रद्द करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यावेळी समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिले. यावेळी किरण चोपडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देशमुख पवार, ग्रामसेवक राजू बोडके, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार , पुनमचंद पवार, रोहिदास पवार, भागचंद पवार, भोजू पवार , धनराज पवार, संजय राठोड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.