शिंदखेडा। ती व्र पाणीटंचाई व दुष्काळामुळे धुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अ क्कलपाडा धरणातून आवर्तन सोडावे, या मागणीसाठी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर बहुप्रलंबित असणारी अक्कलपाडा धरणातील पाणी सोडण्याची मागणी आज पूर्ण झाली. तसेच जिल्हा प्रशासनानाला सोमवारी जाग आल्याने प्रा.शरद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले. अक्कलपाडा धरणातील मृत जलसाठ्यातून दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास 300 वहन क्षमतेने(क्युसेक्स) आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे प्रा.शरद पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
तीव्र पाणीटंचाई : गेल्या 20 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आल्याने तालुक्यासकट पांझरा काठावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या पांझरा काठावरील विहीरी कोरड्या झाल्याने अनेक गावांतील ग्रामस्थ व महिलांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. शिवाय नदीपात्रात पाणी नसल्याने पाळीव जनावरांचेसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी व चार्यासाठी हाल होत आहेत. याप्रकरणी दि.19 मे रोजी जिल्हाधिकार्यांना तातडीने पाणी सोडण्यासाठी प्रा.शरद पाटील यांनी विनंती केली होती.
अनेक गावांना फायदा : अक्कलपाडा धरणातील या आवर्तनाचा फायदा धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील 85 गावांना होणार असून यामुळे सध्या बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु होणार आहेत. यामध्ये नेर, अकलाड, मोराणे, कुसुंबा, मेहरगाव, कावठी, आनंदखेडे, वार, कुंडाणे, मोराणे प्र. वलवाडी, धुळे शहर, वरखेडे, कुंडाणे, जापी, आर्णी, निमखेडी, शिरडाणे, कापडणे, धमाणे, मोहाडी, सातरणे, वणी, सुकवड, न्याळोद, बिलाडी, नगांव, तामसवाडी, कौंठळ, हेंकळवाडी, कंचनपूर, वालखेडा, अजंदे, बेटावद, पडावद, मुडावद, अमळनेर तालुक्यातील जवखेडा, मांडळ, बामणे, भिलाली, शहापूर, तांदळी आदीसह 85 गावांना फायदा मिळणार आहे.
प्रशासनाकडून टाळाटाळ
आवर्तन सुटल्याने पांझरा नदीकाठावरील बंद पडलेल्या नळपाणी योजना सुरु होवून याचा फायदा धुळे व अमळनेर तालुक्यातील 85 गावांना होणार आहे. कापूस लागवड करणार्या शेतकर्यांना व धुळे शहराच्या 2 लाख लोकसंख्येला या पाण्याचा लाभ होणार आहे. अक्कलपाडा धरणात शिल्लक असणारा मृत जलसाठा सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत होते. याप्रकरणी प्रा.शरद पाटील यांनी अक्कलपाडा धरणातून सोमवार,दि.29 मे पर्यंत आवर्तन न सोडल्यास मंगळवार,दि.30 मे रोजी जिल्हाधिकार्यांना त्यांच्याच कार्यालयात आवर्तन सुटेपयरत घेराव घालण्यात येईल, असा इशारा एका पत्रकाव्दारे दिला होता.