जिल्हा बँकेच्या वरखेडी शाखेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी ठोकणार कुलूप!

0

पाचोरा । तालुक्यात 79 विकासोच्या संचालक मंडळ व काही सभासदांनी सहकारात आपले अस्तित्व टिकून राहावे याकरिता उधार- उसणवार पैसे घेऊन विकासोचे कर्ज फेडले. मात्र जिल्हा बँकेच्या एटीएम (रूपे कार्ड)च्या धोरणामुळे शेतकर्‍यांना कर्ज मिळत नसल्याने सभासद शेतकरी मोठ्या कोंडीत सापडला असून वरखेडी येथील बाजार समितीचे माजी चेअरमन डिगंबर पाटील व विकासोचे चेअरमन जयसिंग परदेशी यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वरखेडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचे संकेत यावेळी बोलतांना दिले आहे. गेल्या 3 महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात शेतकर्‍यांचे कर्जमाफीपरिता अनेकांनी प्रश्‍न लावून धरला अनेकवेळा टीव्ही चॅनल व वृत्तपत्रात स्वत: मुख्यमंत्र्यांनी आम्ही कर्ज माफीच्या विरोधात नसल्याचे सांगितल्याने शेतकरी यांनी संभ्रमात असल्यामुळे 31 मार्च अखेर कर्जाची परतफेड केली नाही. काही क्षेत्रिय अधिकार्‍यांनी मनमानी करून कर्ज वाटपाचा दाखला न दिल्याने त्या विकासोचे सभासद शेतकरी मे चा पंधरवाडा उलटून ही कर्जापासून वंचित राहिले आहेत.

जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम नसताना एटीएम देऊन शेतकर्‍यांची कोंडी
जिल्हा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर व काही संचालकांनी कोणत्याही शेतकर्‍यास एटीएम (रूपे कार्ड) दिल्याशिवाय त्याचे खात्यावर कर्ज वाटप करू नये अशी स्वत:च्याच मनाने अंमलबजावणी सुरु करून शेतकर्‍यांना कोंडीत पकडले आहे. जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम नसतांना जिल्हा बँक आयसीआयसीआय बँकेचे एटीएम देवून शेतकर्‍यांना वाटप करणार आहे. यात अनेक कर्जदार शेतकरी वृद्ध व अशिक्षित असल्याने अशा शेतकर्‍यांना पैसे काढण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीस सोबत घेऊन जावे लागेल त्यात बँक खात्यातून एटीएम कोड माहित पडल्यानंतर अशिक्षित व वृद्ध शेतकर्‍याची फसवणूक होऊ शकते. एटीएम कार्ड काढण्यासाठी संबंधित शेतकर्‍याचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड व पॅन कार्ड क्रमांकाशिवाय एटीएम कार्ड अ‍ॅक्टीव होवू शकणार नाही.

किती शेतकर्‍यांकडे पॅनकार्ड आहे याचीही चौकशी जिल्हा बँकेने करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी जिल्हा बँकेची सुमारे 80 टक्के वसुली झाली होती. मात्र यावर्षी केवळ सरादरी 20 टक्के वसुली झालेली आहे. जिल्हा बँकेच्या या जाचक अटीमुळे अनेक शेतकरी जिल्हा बँकेतून सभासदत्व रद्द करून नॅशनलाईज बँकेकडे कर्ज घेऊन आपले व्यवहार सुरळीत करीत असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा बँकेवरच होणार आहे.

देशमुख अभिनंदनास पात्र संचालक
भडगाव येथील जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख यांनी स्वत: जिल्हा बँकेचा मुख्य शाखेत बसून तालुक्यातील सर्व विकासोचे कर्ज भरण्यास प्रोत्साहित करून 100 टक्के वसुली करून घेतली व तालुक्यातील सर्व कर्जदार शेतकर्‍यांना 2 एप्रिलपर्यंतच कर्ज पुरवठा करून दिल्याने ते जिल्हा बँकेचे अभिनंदनास पात्र संचालक ठरले आहे. मात्र इतर तालुक्यात एटीएमची सक्ती का? या विषयी शेतकरी वर्गामध्ये चर्चेला उधाण येऊन जिल्हा बँकेविषयी नाराजीचा सुरु येऊ लागला आहे.