जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रोहिणी खडसेंवर प्राणघातक हल्ला : शिवसेना पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा

भुसावळ/मुक्ताईनगर : शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांमध्ये बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून वादाची ठिणगी पडल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या संचालक अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर पिस्टल, तलवार रोखून शिवसेना पदाधिकार्‍यांनी प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना मानेगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी शिवसेनेचे मुक्ताईनगर तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ल्याला बोदवडमधील वादाची किनार
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत पूर्व प्रचारादरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील व आपणास मुक्ताईनगरातील छोटू भोई, अफसर खान, वरणगावचे समाधान महाजन यांनी आपल्याला धक्काबुकी व दमबाजी केली होती. त्यानंतर शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जावून महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी आम्ही गृहमंत्री व पोलिस अधीक्षकांना छोटू भोई यांचे अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले होते व त्यामुळेच त्यांचा माझ्याविषयी प्रचंड राग होता व त्यातूनच त्यांनी आपल्यावर हल्ला चढवला मात्र आपण त्यातून बचावलो.

मानेगाव फाट्याजवळ पिस्टल व तलवार रोखली
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या फिर्यादीनुसार, चालक सचिन पाटील, स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे, यांच्यासोबत फॉर्च्युनर (एम.एच. 19 सी.सी.1919) सोमवारी रात्री साडेसात वाजता चांगदेव येथे भगवान भोई यांच्या मुलीचा हळद कार्यक्रम असल्याने तेथे भेट दिली व तेथून कोथळीमार्गे मुक्ताईनगराकडे येत असताना मानेगाव फाटा सोडल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर अचानक तीन दुचाकी आल्या व त्यांनी आपल्या वाहनापुढे त्या आडव्या लावल्याने चालकाने वाहन थांबवले. यावेळी सुनील काशीनाथ पाटील याने वाहनाच्या डाव्या बाजूने येवून पिस्टल रोखले तर चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्या हातात तलवार चकाकाली तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. आरोपींनी आपण बसलेल्या दिशेने काचेवर जोरात आघात केल्याने काच फुटला तसेच बोनटचे नुकसान झाले. या प्रकारानंतर आपण प्रचंड घाबरलो व चालकाने तातडीने तेथून गाडी काढली व आपण पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना घडलेली घटना कथन केली.

शिवसेना पदाधिकार्‍यांसह सात आरोपींविरोधात गुन्हा
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या फिर्यादीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी भादंवि 307, आर्म अ‍ॅक्ट 3/25, दंगल आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.