जिल्हा राष्ट्रवादीतली खदखद फलकबाजीतून समोर

0

जळगाव। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपात उफाळून येत असतो. याचाच एक अध्याय शहरातल्या अजिंठा विश्रामगृहासमोर लावलेल्या वादग्रस्त फलकातून दिसून आला आहे. यात थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच प्रस्थापित नेत्यांना दूर सारण्याचे सूचकपणे करण्यात आलेले आवाहन वादाच्या भोवर्‍यात सापडले असून यामुळे राष्ट्रवादीतला संघर्ष हा नव्या पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे.

फलकांंचा ‘पॅटर्न’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध गट एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी सत्तेत असतांनाही या गटांना अगदी थेट पक्षाध्यक्षांसह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसमोर एकमेकांवर मात करण्याचे प्रयत्न केले आहेत. अनेकदा ही खदखद भाषणांमधून निघाली असून काही प्रसंगी जळगाव शहरात फलकांच्या आधारे एकमेकांवर चिखलफेक करण्याचे प्रयत्न झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर बुधवारी लावण्यात आलेल्या फलकामुळे हा ‘पॅटर्न’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रस्थापितांना टोले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांमधील सत्तासंघर्ष कुणापासून लपून राहिलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर अलीकडेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ईश्‍वरबाबूजी जैन, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, वसंतराव मोरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही एकमेकांवर शरसंधान करण्यात आले होते. हा सर्व प्रकार खुद्द शरद पवार यांच्यासमोरच घडला व त्यांनी तो अगदी शांतपणे ऐकूनही घेतला. या पार्श्‍वभूमिवर अनामिक व्यक्तीने लावलेल्या फलकामध्ये जिल्ह्यातील तमाम उपस्थित नेत्यांना टार्गेट करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

मान्यवरांचे प्रति-आव्हान
अजिंठा विश्रामगृहाच्या परिसरातील वादग्रस्त फलक नेमका कुणी लावला याचे उघड झाले नसले तरी यात वरिष्ठ नेत्यांना लक्ष करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमिवर ‘जनशक्ति’ने मान्यवरांची भूमिका जाणून घेतली असता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आपल्याला हा प्रकार माहित नसल्याचे सांगितले. कुणी आम्हाला कात्री लाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याने अवश्य जावे असा टोलादेखील त्यांनी मारला. तर माजी खासदार वसंतराव मोरे यांनी ज्यानेही हा प्रयत्न केला त्याने समोर येऊन बोलण्याचे आव्हान दिले. तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकाला काम करण्याची समान संधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘त्या’ बॅनरमधील नेत्यांना कात्री मारण्याचा अधिकार जनतेला असून जनता जनार्दनच हे ठरविणार आहे. यामुळे कुणी अशा पध्दतीने लपून-छपून वार करण्याला आपण फारसे महत्व देत नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.