जळगाव : शहरातील सालार नगरातील ६२ वर्षीय कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णाचा जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना गुरुवारी दुपारी अडीच वाजाता मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. दोघांवर उपचार सुरु असताना दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे.
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार सुरु आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने याठिकाणाहून त्यांची जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. दरम्यान या रुग्णाचा अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. या ६० वर्षीय रुग्णावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या रुग्णांच्या कुटूंबासह त्याच्या संपर्कात आलेल्या २४ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती मात्र त्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून न आल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. तरीही खबरदारी म्हणून १४ जणांना क्टारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दरम्यान नागरिकांनीही घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.