काळ्या फिती लावून केले काम
सांगवी : किमान वेतन, नियमित वेतन वाढ व विनाअट शासनाच्या सेवेत सहभागी करून घेणे यासारख्या मागण्यांच्या कारणास्तव येथील जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्माचार्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. एनएचएम अंतर्गत डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, कार्यालयीन स्टाफ यासारखे कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांनी मागील आठवड्यात काम बंद न करता काळ्या फिती लावून राज्य संघटनेच्या आंदोलनात सहभाग दर्शविला होता. परंतु चार दिवसांपूर्वी राज्यस्तरीय बैठकीत कंत्राटी कर्मचार्यांच्या विषयावर सकारात्मक निर्णय न झाल्याने आज अचानक काम बंद केले. बंद व मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रूद्राप्पा शेळके यांना देण्यात आले.
रूग्णसेवेवर ताण नाही
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके म्हणाले की, सकाळी अकराच्या सुमारास मला बंदच्या संदर्भातील निवेदन मिळाले. आमच्याकडील नियमित स्टाफ, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, शिकाऊ परिचारीका यांच्यामुळे रूग्णसेवेवर कोणताही ताण आला नाही. लहान मुलांचा वॉर्ड, डायलेसिस सारख्या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांनी हजेरी लावल्याने सर्व सुरळीत चालू आहे. संप मागे घ्यायचा की पुढे तसाच चालू ठेवायचा, हे आरोग्य मंत्र्यांसमवेत होणार्या चर्चेवर अवलंबून राहील.