सामान्य उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालय अधिग्रहित
जळगाव– राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड-19 (कोरोना रुग्णालय) रूग्णालय म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जाहिर केले. दरम्यान सामान्य उपचारांसाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुढील आदेश होईपर्यंत अधिग्रहीत करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी देखील केली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सद्यःस्थितील दाखल रुग्णांपैकी ज्यांना घरी सोडणे शक्य असेल अशा रुग्णांना परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने त्यांना वाहन व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालयापासून रुग्णांना त्यांच्या घरापर्यंतचे भाड्याची रक्कम स्वत: अदा करावी लागेल. ज्यांना घरी सोडणे शक्य नसेल अशा रुग्णांना डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण स्थलांतरीत व डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णालयात कोरोनाचे संशयीत आणि पॉझेटिव्ह रुग्ण दाखल करून घेण्याआधी संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी पुढे सांगितले की, कोरोना संशयीतांचे चाचणीसाठी पाठवायचे नमुने दररोज सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान संकलीत करून ११ वाजेला पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत आणि तसा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा.
गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश
कोरोनासारख्या विषाणूचा जिल्हा प्रशासन प्रभावीपणे सामना करीत असताना आरोग्य खात्यातील काही कर्मचारी बेकायदेशीररित्या गैरहजर आहेत. त्या सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांना आरोग्य प्रशासनाने कामावर तात्काळ हजर होण्याविषयी कळविले असूनही जे कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.