शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी
भुसावळ : लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला बाधा आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात लाखोंचे रोजगार गेलेले आहेत तर बहुतांश छोटे-मोठे उद्योग बंदच पडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राज्यातील 25 हजार उद्योग सुरू करण्यात आले असल्याचे नुकतेच सांगितले आहे. जरी हे उद्योग सुरू करण्यात आले असले, तरी अद्याप त्याला उभारणी मिळालेली नाही. याचे कारण जेमतेम चार ते पाच टक्के कामगारांना सोबत घेत सुरू करण्यात आलेले उद्योग किती उत्पादन करू शकतील आणि किती व्यवसाय करू शकतील हा प्रश्न आहेच म्हणून संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कारखाने, उद्योग सुरू करण्यात यावे व स्थानिकांना त्यात रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शुक्रवार, 15 मे रोजी, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.
कोरोनामुळे रोजगाराची व उन्नतीची संधी
आपल्या गावाकडे परत गेलेले परप्रांतीय मजूर त्वरेने पुन्हा पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात लगेचच परततील ही शक्यता सुद्धा नाही त्यामुळे स्थानिक गरजूंना रोजगार उपलब्ध करून बेरोजगारीच्या समस्या कायम स्वरूपात समाप्त कराव्यात. सरकारने प्राधान्य संकटात सापडलेल्या कामगारवर्गाला पाठबळ देतांना आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी उद्योजकांना पाठबळ द्यावे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिकांना रोजगाराची व उद्योजकांना उत्पादनातुन उन्नतीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन उद्योजकांना प्रा.धिरज पाटील यांनी केले.
स्थानिक नागरिकांनी रोजगार स्वीकारावे
स्थानिक लोकांनी हे रोजगार त्वरीत स्वीकारावे. कमी पगाराची किंवा दुय्यम दर्जाची नोकरी स्थानिक लोक सहज नाकारतात आणि परप्रांतीय या संधीचा फायदा घेत होते. आता स्थलांतरीत मजुरांना आता दोष न देता या संधीचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन स्थानिक गरजवंतांना प्रा.पाटील यांनी केले आहे.