जळगाव। नाशिक, धळे व जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी अशा दोन दिवस गावठी दारुंच्या अड्डयांवर छापा मारीत अड्डे उद्ध्वस्त केले. यात 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर एका जणाला अटक करण्यात आली आहे. गावठी दारु, रसायन यासह वाहने असा 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
असा मिळाला मुद्देमाल..
भरारी पथकाने जिल्हा अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली खेडी कढोली, सुजदे, भोलाणे,उदळी, गाते व सावतर निंभोरा येथे दोन दिवस धाडसत्र राबविले. गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. 23 हजार 500 लीटर कच्चे रसायन, 290 लीटर दारू व दोन दुचाकी असा एकूण 5 लाख 79 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील रसायन व दारू नदीपात्रात टाकून नष्ट करण्यात आली. दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहेत. नदी पात्रात लपविलेल्या रसायनाच्या टाक्या बाहेर काढण्यात आल्या. यात संजय देवराम बाविस्कर (रा.गाते, ता.रावेर) याला अटक करण्यात आली आहे. पथक येणार असल्याची कुणकुण लागल्याने अन्य ठिकाणचे आरोपी सामान सोडून फरार झाले आहेत.
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव। सेप्टीक झाल्याने वृध्द महिलेस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतू वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृध्द महिलेने सकुबाई असे तिचे नाव सांगितले होते. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून पूढील तपास सतिष सुरळकर हे करीत आहेत. तरी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.