जलसंपदा विभाग, महापालिका यांच्यासोबत जिल्हा प्रशासनाच्या बैठका
पुणे : जिल्ह्यातील प्रमुख 23 धरणांमध्ये मिळून सरासरी सुमारे 55 टक्के म्हणजे 96.32 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी परिस्थिती आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता याचा विचार करता उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक बनले आहे. पुढील सहा महिन्यांचा विचार करता पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याची जबाबदारी आता जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यावर आहे.
जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. जून-जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दोन महिन्यांत वापर झालेला पाणीसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परतीच्या पावसाने निराशा केल्याने जिल्ह्यात दुष्काळीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात पाण्याची वाढती मागणीचा विचार करता प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर आला आहे. उन्हाळ्यामध्ये होणारे बाष्पीभवन आणि पिके जगविण्यासाठी ग्रामीण भागातून पाणी सोडण्याची मागणी अधिक जोर धरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
पाणीवाटपाबाबत समन्वय आवश्यक
सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठ्याचा विचार करता पाणीवाटपाबाबत समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग, महापालिका यांच्यासोबत जिल्हा प्रशासन बैठका घेत आहे. तसेच या सर्व विभागांकडून जिल्हा प्रशासनाला दररोजची स्थिती प्राप्त होत आहे. पुढील जूनपर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्यासाठी नियोजनात्मक पद्धतीने पाण्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
धरणांतील एकूण पाणीसाठा
धरणाचे नाव टक्केवारी
मुळशी 69.06
गुंजवणी 58.48
भाटघर 68.60
पवना 70.44
वीर 71.86
नीरा देवधर 65.89
भामा-आसखेड 70.84
चासकमान 46.40
माणिकडोह 14.62
कळमोडी 82.40