जिल्ह्यातील पाणीसाठ्यात घट

0

धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा शिल्लक

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा शिल्लक राहिला आहे. साठ्याचे हे प्रमाण 58.31 टक्के इतके अल्प आहे. गतवर्षी आजअखेर या धरणांमध्ये 116.10 टीएमसी (86 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 37.37 टीएमसी पाणीसाठा घटला आहे. पाणीसाठ्याच्या या स्थितीमुळे जिल्ह्यावर येत्या उन्हाळ्यात पाणीबाणीचे संकट येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचे परिणाम थेट ऊस, फळबागा, भाजीपाला उत्पादनावर आणि गुरांसाठीच्या पिण्याच्या पाण्यावर होणार आहेत. उत्पादनातील घटीची परिणीती ही भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

जिल्ह्यात शेती सिंचनासाठीच्या पाण्यावर विपरित परिणाम होणार आहे. कारण धरणातील सिंचनाच्या पाण्यात कपात करावी लागणार आहे. याचा द्राक्षे, केळी, अंजीर, डाळिंब आदी फळबागांना आणि उसाला फटका बसणार. या फळबागांसह ऊस आणि भाजीपाल्याच्या उत्पादनही घट होणार आहे. यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडण्याचा संभाव्य धोका आहे. सिंचन कमी झाल्याने, गुरे आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेले पिण्याच्या पाण्याचे ठिकठिकाणी असलेले छोटे जलसाठे संपुष्टात येणार आहेत. यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. अनेक गावांमध्ये केवळ पाण्याअभावी जनावरांची संख्या घटण्याची शक्यता वाढली आहे.

नवीन ऊस लागवडीला लगाम

पाण्याअभावी नवीन ऊस लागवडीला लगाम बसेल. यामुळे उसाच्या क्षेत्रात घट वाढेल. याचा विपरित परिणाम साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामावर होणार आहे. केवळ उसाअभावी अनेक कारखान्यांच्या गाळपात घट होईल, तसेच साखरेच्या उत्पादनातही घट होईल. शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या रोजगारात घट होणार आहे. सिंचन कमी झाल्याने, त्यासाठी लागणारा मजूर वर्ग आणि कारखान्याचे गाळप कमी झाल्याने, त्याचा थेट परिणाम हा ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार आहे.

प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा टीएमसीमध्ये

पिंपळगाव जोगा1.50 (38.68)
माणिकडोह1.95 (19.16)
येडगाव0.99 (35.52)
डिंभे7.68 (61.47)
घोड2.14 ( 39.14)
चासकमान4.13 (54.48)
भामा आसखेड5.64 (73.59)
पवना6.40 (75.18)
टेमघर0.14 (3.85)
वरसगाव10.43 (81.37)
पानशेत7.60 (71.89)
खडकवासला0.94 (47.70)
गुंजवणी2.16 (58.48)
नीरा देवघर8.69 (74.10)
भाटघर18.28 (77.80)
वीर6.06 (64.43)