जिल्ह्यातील युवकांचे तातडीने लसीकरण करा

विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव – कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा युवकांना बाधित करीत आहे. त्यामुळे युवकांना या नव्या स्ट्रेनची बाधा होऊ नये यासाठी त्यांचे तातडीने लसीकरण करावे यासह विविध मागण्यांसदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नॉन कोविड रूग्णाला कोरोना काळात इतर रूग्णालयात दाखल करणे मोठे अडचणीचे होत आहे. नॉन कोविड रूग्णांना भरती करण्यासाठीची व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतील ३० टक्के निधी कोविडसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातुन प्रत्येक तालुक्याला ऑक्सीजन जनरेटर प्लांट उभारण्यात यावे, कोरानाचा नवीन स्ट्रेन दाखल झाला असुन युवकांना मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. तरी तातडीने युवकांचे लसीकरण करावे अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुकास्तरावर विवाह नोंदणी कार्यालय व्हावे
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर विवाह नोंदणी कार्यालये आहेत. सध्या कोरोनाची परिस्थीती असल्यामुळे नागरिकांना जिल्हास्तरावर येणे हे धोक्याचे आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात विवाह नोंदणी कार्यालय उभारावे किंवा शिबीराचे आयोजन करावे अशी मागणीही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रकांत पाटलांवर कारवाई करा
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते ना. छगन भुजबळ यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त केला जात असुन चंद्रकांत पाटलांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.