जळगाव – जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील रेशन दुकानांसाठी आता विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान वय वर्षे ४५ च्या वरील सर्व दुकानदारांना लसीकरण करून घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रोज हजाराच्या पटीत रूग्ण आढळुन येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडुन उपाययोजनांचा भाग म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून रेशन दुकानांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत आज तसे आदेशही जारी करण्यात आले आहे.
असे आहेत निर्बंध
दि. ५ ते ३० एप्रिल या कालावधीत आठवड्यातील सर्व दिवस रास्त भाव दुकानदारांनी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दुकाने सुरू ठेवुन धान्य वितरण करावयाचे आहे. दुकानाच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळण्यासाठी जमिनीवर खुणा करून घेणे, दुकानदार आणि ग्राहक यांनी मास्कचा वापर अनिवार्य करणे, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे असे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
शिवभोजन केंद्रांसाठी केवळ पार्सल सुविधा
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांसाठीही निर्बंध लागू करण्यात आले असुन लाभार्थ्यांना केंद्रस्थळी बसून जेवण करता येणार नाही. त्यांना पार्सलची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
Prev Post