जळगाव । जिल्हा परिषद शिक्षकांनी त्यांच्यावरील वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे तसेच शासनाचे दररोज येणार्या आदेशांनी त्रस्त होवून राज्यभरात आंदोलन पुकरले आहे. यानुसार आज जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा आणला होता. या मोर्चांत शिक्षक, शिक्षीका तसेच त्यांचे परिजणसुद्धा सहभागी झाले होते. या मोर्चांची सुरूवात जिल्हा परिषदे समोरील श्यामाप्रसाद उद्यानातून दुपारी 1 वाजून 45 मिनीटांनी शिस्तीत करण्यात आली. दरम्यान, महामोर्चांच्या सुरवातीला चाळीसगाव तालुक्यातील ऑनलाईनच्या कामातून आत्महत्या करणारे शिक्षक आबासाहेब चौधरी यांच्यासह ऑनलाईन व पोषण यातून त्रासून आजपर्यंत 50 बळी ठरलेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चांत सहभागी आंदोलकांनी त्यांच्या हातांमध्ये लक्षवेधी व मार्मिक असे फलक घेतले होते. या मोर्चेकर्यांनी ‘गुरूजींचे आचारी पुरे झाली लाचारी‘, ‘शिक्षकांचे एकच मिशन जुनी पेंशन जुनी पेंशन‘, ’केंद्र शाळांना डाटा ऑपरेटर मिळालाच पाहिजे’ ‘बदली धोरणातील त्रुटी दूर झाल्याच पाहिजे‘आदी मागण्यांचे फलक हातात घेतले होते. तर शिक्षकांनी डोक्यावर ‘एकच मिशन जुनी पेंशन ‘ घोषवाक्य असलेली टोपी घातली होती.
सहकार राज्यमंत्र्यासह आमदारांनी दिला पाठिंबा
शिक्षकांच्या मागण्यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दर्शविला आहे. तसेच शिक्षकांच्या 12 संघटनांनी व खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या संघटना व विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानातून निघालेला हा महामुकमोर्चा टॉवर चौक, महापालिका प्रशासकीय इमारत, नेहरू चौक, खान्देश कॉम्प्लेक्स, शिवाजी पुतळा, स्टेडीयम, नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य वीर सावरकर चौक मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.
अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी
या मोर्चांत जिल्हाभरातील जवळपास चार ते पाच हजार शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा मुकमोर्चा दुपारी 2 वाजून 45 मिनीटांनी आल्यावर तेथे मोर्चांचे रूपांतर सभेत करण्यात आले. या सभेत महिलांनी भाषणातून आपली व्याथा मांडली. शिक्षकांना ऑनलाईन कामे दिली जातात परंतु ही कामे वेब साईट व्यवस्थित न चालणे आणि शिक्षण विभागाचे पोर्टल बंद पडणे, यामुळे इंटरनेट कॅफेवर जागरण करावे लागत असल्याचे सांगितले. दिवाळी सारख्या सणांच्या सुट्ट्यांमध्ये ऑन लाईनची कामे शिक्षकांना करावी लागल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिक्षकांवर ऑन लाईनचा बडगा नसवा असा सून यावेळी व्यक्त करण्यात आला. ऑन लाईन आदेश येत असल्याने शिक्षकांना त्याचे उत्तर ऑन लाईन तसेच ऑफ लाईन द्यावे लागत आहे. यात शिक्षकांना त्यांचे मुख्य कर्तव्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणे याकडे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
संगणक प्रशिक्षणाची मुदत वाढवा
शिक्षकांना ऑपरेटर करण्यापेक्षा प्रत्येक केंद्रावर एक स्वंतत्र ऑपरेटर नेमण्याची मागणी करण्यात आली. चौधरी गुरूजींच्या मृत्यूने शिक्षक हवाल दिल झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शासन शिक्षकांना पेन्शन लागू करतांना जुनी व नवी पेन्शन असा भेदभाव करून शिक्षकांमध्ये फुट पाडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 27 फेब्रुवारी 2017 च्या बदल्याबाबतच्या शासाननिर्णयातील अन्यायकारक बाबी रद्द करण्यात याव्या, 23 ऑक्टोंबर 2017 रोजी काढण्यात आलेल्या निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा, नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शंन योजना लागू करावी, संगणक प्रशिक्षणाची मुदत वाढवून मिळावी आदी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा परिषद मुख्याधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यांनी दिले निवेदन
मोर्चा जळगाव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीद्वारे अजबसिंग पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. यमहामुकमोर्चाच्या अग्रभागी शिक्षीका होत्या तसेच पाकिजा पटेल, संगीता मगर, छाया सोनवणे, विद्या कदम, आपेक्षा तरन्नुम खान, मनिषा पाटील या पाच शिक्षीकांनी निवेदन दिले. व मोर्चाला अर्चना पाटील, रेखा रुले, गजला तबस्सुम, प्रमिला मोरे, विद्या बोरसे यांनी संबोधित केले.
समन्वयक समिती सदस्य
समन्वयक अजबसिंग पाटील
शिक्षक संघ अध्यक्ष विलास नेरकर,
शिक्षक सेना अध्यक्ष यशवंत सपकाळे
राष्ट्रवादी शिक्षक संघ अध्यक्ष सुनिल पाटील
पदवीधर शिक्षक महासंघ अध्यक्ष विजय बागुल
केंद्र प्रमुख संघ अध्यक्ष शिवाजी पाटील
राज्य संघटक मुख्याध्यापक संघ लिलाधर सपकाळे
मुख्याध्यापक संघ अध्यक्ष भगवान वराळे
शिक्षक समिती अध्यक्ष राजेश पवार
अपंग कर्मचारी संघटना अध्यक्ष रविंद्र पाटील
शिक्षक परिषद अध्यक्ष दिलीप पाटील
शिक्षक सेवा संघटना अध्यक्ष महेश पाटील
शिक्षक भरती अध्यक्ष अजय पाटील
कास्ट्राईक शिक्षक संघ अध्यक्ष बापू साळुंखे.
उर्दू शिक्षक संघ अध्यक्ष अल्ताफ सर
मरा उर्दू शिक्षक संघ अध्यक्ष नफिस सर
राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष ईश्वर पाटील
पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद अध्यक्ष राकेश पाटील
समता शिक्षक परिषद अध्यक्ष किशोर पाटील (कुंझरकर)
महिला शिक्षक संघटना अध्यक्षा पाकिजा पटेल
प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्षा अरुणा उदावंत
शिक्षक सेना महिला आघाडी अध्यक्षा मनिषा पाटील
डीसीपीएस संघटन अध्यक्ष गोविंदा ठाकरे
प्रहार आश्रम शाळा संघटन अध्यक्ष हेमंत मोरे
शिक्षक समिती उर्दू अध्यक्ष सैय्यद शफिक सिध्दीकअली श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून भव्य मोर्चा निघाला होेता. मोर्चाच्या अग्रभागी शिक्षिका व त्यांच्यानंतर शिक्षक एका ओळीत जिल्हाधिकार्यांनी कार्यालयावर धडकले.