जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पीक कर्जाचा प्रश्‍न गंभीर

0

पाचोरा (दिनेश पाटील)। जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी मार्च महिन्यात कर्जरूपी सोसायट्या भरल्या परंतु जिल्हा बँकेने दहा दिवसानंतर सोसायट्या परत करणे आवश्यक असतांना त्या आजतागायत परत केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. पहिलेच शेतकर्‍यांचे कवडीमोल भावाने शेतमाल विकून, घरातील स्त्रीयांचे दागीने मोडून इमानदारीने जिल्हा बँकेचा कर्जरूपी भरणा केला व काही उसनवारी करून खाते निल केले.

पेरणी तोंडावर आली मात्र बियाण्यांसाठी पैसे नाही: शेतकर्‍यांनी उसणवारी करून शेतकर्‍यांनी आपले खाते निल केले कारण मार्चमध्ये सोसायट्या भरल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्‍यांना सोसायट्या मिळतात. त्यावर शेतकरी वर्ग उधार उसनवारी देऊन शेतीच्या मशागतीसाठी, नांगरणी, वखरणी, ट्रिलर, रोटोव्हेटर, करीत असतो. त्यानंतर उन्हाळी कपाशी लागवडीसाठी बियाणे, मटेरियल, ठिंबकसंच यासाठी शेतकर्‍यांना अत्यंत पैशांची गरज असते. परंतु जिल्हा बँकेने दिड महिना उलटला तरी याबाबत निर्णय घेलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झालेला असून त्यांच्यापुढे दुसरा पर्यायी मार्ग नाही. काही कर्जदार कर्जमाफी होणार या आशेने थकीत आहेत. परंतु त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. परंतु इमानदारीने कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे.

पीककर्ज उपलब्धतेची मागणी
याबाबतीत जिल्हा बँकेचे धोरण अजूनही तळ्यात- मळ्यात दिसते. जिल्हा बँक ज्या शेतकर्‍यांची समजली जाते ती बँक आज शेतकर्‍यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेबद्दल प्रचंड चिड निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये प्रचंड उदासिनता व असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने ताबडतोब आपले धोरण व सोसायट्या देण्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे. तरी प्रशासनाने व संचालक मंडळाने ताबडतोब याबाबत निर्णय घ्यावा व शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा.