जिल्ह्यातील 100 पशुवैद्यकीय दवाखाने करणार आयएसओ मानांकीत

0

पुणे । पशुधनाला चांगल्या दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय 100 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन करण्याचा निश्चय जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली़

जिल्हा परिषदेचे 227 आणि राज्य शासनाचे 95 तसेच एक फिरता दवाखाना असे मिळून 323 दवाखाने आहेत. अद्यापपर्यंत खेड तालुक्यातील कुडे बुद्रूक येथील एकच दवाखाना आयएसओ मानांकीत झाला आहे. जिल्ह्याच्या 13 तालुक्यांतील प्रत्येक तालुक्यात आठ ते नऊ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्या सर्वांना आयएसओ मानांकन मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अधिकार्‍यांची पदे रिक्त
सध्या जिल्ह्यातील काही पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये परिचर, व्रणोपचारक, पशुधनविकास अधिकारी व पर्यवेक्षकांची काही पदे रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे पशुधनास वेळेवर औषधोपचार मिळत नाही. काही ठिकाणी, स्वच्छतेचाही अभाव असल्याचे चित्र आहे.

दवाखान्यांच्या नोंदणीचा खर्च लोकवर्गणीतून
आयएसओ मानांकन मिळविताना पहिला टप्पा म्हणजे संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यांची नोंदणी करणे. यासाठी प्रत्येकी तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. हा खर्चही लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. तसेच दवाखान्यात लागणारे किरकोळ स्वरुपाचे साहित्यही जमा होणार्‍या सेवाशुल्कातून घेण्यात येणार आहे.

तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या
जुन्नर 28, आंबेगाव 21, खेड 24, हवेली 11, मावळ 16, मुळशी 09, वेल्हा 08, भोर 11, पुरंदर 11, बारामती 23, इंदापूर 27, दौंड 27 आणि शिरूरमध्ये 11 असे 227 तर आंबेगाव तालुक्यातील कुडे बुद्रूक येथे एक फिरता दवाखाना आहे. राज्य शासनाचे 95 असे एकूण 323 दवाखाने जिल्ह्यात आहेत.