जिल्ह्यातील 679 ग्रामपंचायतींमध्ये विद्युत व्यवस्थापक नियुक्त केले जाणार

0

धुळे । जिल्ह्यातील 679 ग्रामपंचायतींमध्ये विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात येणार आहे. ही कार्यवाही लवकरच सुरू होईल. त्यामुळे ग्रामस्थांना विद्युत कामे करणारा हक्काचा व्यक्ती मिळेल तसेच रोजगाराची उपलब्धता होईल. तसेच इलेक्ट्रीक विषयात पदवी, पदविका घेणार्‍या बेरोजगारांना ठेकेदाराचा परवाना देण्यात येतील. त्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आवाहन केले. धुळे, नंदुरबार, पालघर, गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यातील प्रत्येक गावपाड्यापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी 1 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात दुर्गम भागापर्यंत वीज पोहोचेल. गावागावात ग्राम रक्षक दल नियुक्त करण्यात येणार आहे. या दलांना अवैध दारू बंद करण्याचे अधिकार असणार आहे.

33 केव्ही उपकेंद्र
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकर्‍यांनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी गट तयार करीत स्वत:च वीज तयार करुन या विजेचा वापर करावा. गट तयार जिल्ह्याला 327 दिवस सौरऊर्जा प्राप्त होवू शकते. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत प्रस्तावित 33 केव्ही उपकेंद्र दुसाणे, उमरपाडा, नांद्रे, सौंदाणे, आरावे, दलवाडे, रोहिणी, चाळीसगाव रोड, चक्करबर्डी, भोकर, देवपूर या उपकेंद्रांचे ई-भूमीपूजन करण्यात आले.

विहीरींची कामे होणार
शेतकर्‍यांना वीज जोडणी तत्काळ मिळावी तसेच रोहयो अंतर्गत तयार होणार्‍या विहिरींना तत्काळ वीज जोडणी मिळावी, अशी अपेक्षा रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल म्हणाले. ग्राहकाभिमुख उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात 80 हजार विहिरींचे काम सुरू आहे. त्यातून पावणे तीन लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या विहिरींनाही वीज जोडणी तत्काळ मिळावे असे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले.धुळे शहरात भूमिगत केबल टाकण्यात यावी. तसेच रस्त्यात येणार्‍या डीपी व पोल हटविण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना द्यावेत असे खासदार डॉ. हिना गावित यांनी सुचविले. याप्रसंगी आमदार डी.एस.अहिरे, महापौर कल्पना महाले यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता जनवीर यांनी प्रास्ताविक केले. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.