जिल्ह्यातील 89 गावांना पाणीटंचाईचे चटके

0

जळगाव । मे हिटच्या तडाख्यात जिल्हाभरातील 89 गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लाग आहे. यातील 55 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून 45 अंशाच्यावर तापमान गेले असताना ग्रामस्थांना मात्र, पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक 43 गावांना या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. यानंतर जामनेर तालुक्यातील 22 गावांचा यात समावेश आहे.

आगामी महिना बिकट
जिल्ह्यात 889 गावे पाणी टंचाईच्या आराखड्यात आहे. जलस्त्रोत आटत असल्याने आगामी महिनाभरात काही तालुक्यात पाणीटंचाई होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे 29 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर केला असल्याची माहीती आहे. अमळनेर तालुक्यात 20 टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर जामनेर तालुक्यात 22 गावांना 18 टँकर व्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर पारोळा तालुक्यात 15 गावांना 9 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु आहे.

विहीरी अधिग्रहीत करणार
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 160 गावांमध्ये 159 विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात 31, अमळनेर तालुक्यात 37 तर पारोळा तालुक्यात 12 विहीरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहे. 20 गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना सुरू करण्यात आल्या असून 119 गावांमध्ये 318 विंधन विहीरी सुरू करण्यात आल्या आहे. 44 गावांमध्ये 97 कुपनलिका सुरू करण्यात आल्या आहे.