जिल्ह्यात अनेक शाळा शिक्षकांविना

0

पुणे । शुक्रवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या काही शिक्षकांना अद्याप शाळेत प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे. भोर तालुक्यातील 41 शाळा शिक्षकाविना आहेत, तर अन्य तालुक्यातही हीच परिस्थिती असून, या शाळांवर तात्पुरत्या स्वरुपात इतर शाळांमधील शिक्षकांची नेमणूक करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आली आहे.

152 शिक्षक विस्थापित
यंदा ग्रामविकास विभागाकडून ऑनलाईन पध्दतीने पुणे जिल्ह्यातील 6 हजार 43 पैकी तब्बल 5 हजार 388 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे बदल्या झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या प्रक्रियेत 655 शिक्षक विस्थापीत झाले आहेत. विस्थापीत शिक्षकांनी केलेल्या सूचना, बदली प्रक्रियेतील त्रुटी, अडचणी या दाखवून दिल्यानंतर ग्रामविकास विभागाकडून या सर्व बाबींचा अभ्यास करून दोनवेळा शिक्षक बदल्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये आतापर्यंत 503 शिक्षकांना शाळा देण्यात आली. मात्र, त्यामध्ये महिलांना अवघड आणि दुर्गम भागात जावे लागले. एवढे करूनही सध्या 152 शिक्षक विस्थापीत आहेत. शाळा सुरू झाल्या तरीही या शिक्षकांना अद्याप बदल्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळा या शिक्षकाविना आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
भोर तालुक्यातील 41 शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत. काही ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी आहे. ज्या शाळा शिक्षकाविना आहेत, त्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. जोपर्यंत दुसरे शिक्षक बदली होऊन येत नाहीत तोपर्यंत या शिक्षकांची नेमणूक असेल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, असे जिल्हा परिषद शिक्षण सभापती आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?
एक किंवा दहा पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांचा यात समावेश असून, दहा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळाही शिक्षकाविना आहेत. भोर तालुक्यात तब्बल 41 शाळा शिक्षकाविना असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. तसेच जुन्नर तालुक्यातील काही शाळाही शिक्षकाविना असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांला शाळेची ओढ लागावी यासाठी ढोल-ताशाचा गजर, रांगोळी काढून, फुलांचे पायघडे घालणे, गुलाब फुल किंवा पुस्तक भेट देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परंतु, ज्या शाळांमध्ये शिक्षकच नाही, त्या शाळेमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या शाळांना शिक्षक कधी मिळणार असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.