नंदुरबार । जिल्हाभरात सर्रास गुटख्याची विक्री सुरू असून अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचा आरोप करीत, यावर वचक ठेवण्यासाठी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
केवळ बघ्याची भूमिका
जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा होवून जवळपास 15 वर्ष उलटून सुद्धा आजपर्यंत जिल्ह्यात अन्न, औषध प्रशासन विभागाचे कार्यालय सुरु झालेले नाही. वास्तविक पाहता नंदुरबार जिल्ह्यात 70 टक्के आदिवासी समाज असून या समाजाच्या आरोग्याच्यादृष्टीने अनेक गुंतागुंतीच्या समस्या आहेत. आणि जिल्ह्यात अन्न, औषध विभागाचे कार्यालय नसल्यामुळे अनेक ठिकाणी विना परवानगी हॉटेल व्यवसाय सुरु झाले आहेत. याकडे प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे.
अनेक आजारांची लागण
तसेच आरोग्यास अपायकारक असणार्या खाद्य पदार्थ तसेच भेसळयुक्त मावा, दूध व तेलकट खाद्य पदार्थ कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता तसेच अन्न, औषध प्रशासनाच्या मानकावर आधारित विक्रीचे परवान्याशिवाय विक्री होत आहेत. अशाप्रकारे ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सद्या जिल्ह्यात सुरु आहेत. फळांवर खात रसायनांद्वारे फळ पणन प्रक्रीया केली जात आहे. तसेच घातक रसायनांच्या इंजेक्शनचा वापर करुन गाई, म्हशींचे अनैसर्गिक पद्धतीने नफा कमविण्याच्यादृष्टीने दूध काढले जाते. त्यामुळे नागरीकांच्या जीवास दुषीत दूध व घातक फळांमुळे कॅन्सर, डायरीयासारखे अनेक आजार होत आहेत.
कायदेशीर कारवाई हवी
उघड्यावर मांसविक्रीपासून ते इतर अनेक खाद्य पदार्थ यासह विमल गुटखा, तंम्बाखु जन्य पदार्थ आदींची सर्रासपणे विक्री सुरु आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे कॅन्सरसारख्या विकाराने त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत. म्हणून गुटखा सम्राटांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात कोणीही असा प्रकार करणार नाही.
यांची होती उपिस्थती
त्यामुळे आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण यांनी दिला आहे. निवेदन देतेेवेळी जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, शाखाप्रमुख लखन माळी, प्रकाश घमंडे, नरेंद्र गुमाणे, सचिन भाट, विशाल इंद्रेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.