जिल्ह्यात कोसळधारा : पिकांना मिळाली संजीवनी

0

भुसावळ विभागात संततधारा कायम : पालजवळील सुकी नदीला पूर

भुसावळ- तब्बल 22 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्हाभरात मुसळधार पाऊस होत असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ विभागात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कायम असून रावेर तालुक्यातील पालजवळील सुकी नदीला पूर आला आहे. पाऊस गायब झाल्याने पिकांवर मोठा परीणाम होण्याची भीती व्यक्त होत होती मात्र जिल्हाभरात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, जळगाव शहरातही जोरदार पाऊस सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नसल्याचे चित्र होते तर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या हतनूर धरणाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात 41.76 टक्के जलसाठा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळ विभागात मुसळधार
भुसावळ शहरात गुरुवारी सकाळी सात वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरातील सखल भागात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र होते. शहरातील बसस्थानकात पावसामुळे तळे निर्माण झाले असून प्रवाशांना मोठा मनस्ताप त्यामुळे सहन करावा लागला. भुसावळसह परीसरातील गावांमध्ये पाऊस असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. रावेर तालुक्यातील पालजवळील सुकी नदीला पावसामुळे पूर आला आहे. रावेर शहर व तालुक्यात पहाटे तीन वाजेपासून पावसाला सुरुवात झाली तर नऊ वाजता विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दहा वाजेपासून जोमाने बरसायला सुरुवात केली आहे.

कृषी पिकांना संजीवनी
तब्बल 22 दिवसांपासून गायब झालेल्या पावसामुळे पिकांवर विपरीत परीणाम झाला होता तर गुरुवारच्या पावसामुळे पिकांना मात्र संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. सततच्या धुक्कट व दमट वातावरणाने पिके पिंगट पडत होते व रोगराई वाढत होती. फुलोर्‍यातील मका कोमेजून वाकत होता. शेतीजन्य खर्चाची मशागत कामे निंदनी, कोळपणी, फवारणी, नियमीत करावीच लागत होती. दुष्काळाचे सावट व खर्चाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला होता. या गंभीर स्थितीत धाऊन आलेला हा पाऊस शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरला आहे.