पुणे । पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या. जून ते जुलै या दोन महिन्याच्या कालाावधीत बहुतांश तालुक्यातील सरासरी 60 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत, असे जिल्हापरिषदेतील कृषी विभागातील अधिकार्यांनी सांगितले. परिणामी यंदाच्या खरीपाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात एकूण खरीप तृणधान्यांचे 1 हजार 493.9 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर खरीप अन्नधान्याची 1 हजार 787 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तेलबियाची 521.2 हेक्टरवर पुर्ण झाली आहे. ऊस वगळता एकूण 2 हजार 308 क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. खरीपाच्या पेरणीचे प्रमाण सरासरी 60 टक्के झाले आहे.
भात, ज्वारीला प्राधान्य
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका आदी तृणधान्यांच्या पेरणीला प्राधान्य देण्यात आले आहे. हवेली तालुक्यात 13.71 हेक्टरवर खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. अन्नधान्याची पेरणी 21.26 हेक्टरवर झाली आहे. तसेच तेलबिया 5.9 हेक्टर, अन्नधान्य व कापूस क्षेत्राचे 27.16 हेक्टर, ऊस वगळता एकूण 63.4 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
मुळशीत 47.5 हेक्टरवर पेरणी
मुळशी तालुक्यात एकूण खरीप तृणधान्यांची 38.87 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तर अन्नधान्ये 39.86, तेलबिया 5.8 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊसाशिवाय 47.5 हेक्टरवर खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. तर भोरमध्ये खरीप तृणधान्य 40.29, खरीप अन्नधान्य 50.4, तेलबिया 39.3 तर खरीप मिळून 90.9 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मावळमध्ये खरीप तृृणधान्ये 72.46, खरीप अन्नधान्ये 72.46, तेलबिया 1.93 तर एकूण खरीप 74.4 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
जुन्नरमध्ये 483.5 हेक्टरवर पेरणी
वेल्हा तालुक्यामध्ये तृणधान्य 30.61, अन्नधान्ये 31. 41, तेलबिया 0.64 अशी एकूण 32.2 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. जुन्नरमध्ये तृणधान्याची 127.9, अन्नधान्य 137.13 हेक्टर, तेलबिया 82.31 एकूण 483.5 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. खेडमध्ये खरीप तृणधान्य 106.22, अन्नधान्य 117.58, तेलबिया 85.89 अशी 306.6 हेक्टरवर पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये तृणधान्य 79.37, अन्नधान्य 92.88, तेलबिया 42.89 एकूण 294.5 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. शिरूरमध्ये तृणधान्याची 156.71 अशी एकूण 430.3 हेक्टरवर पेरणी झाली आहे. बारामतीत तृणधान्य 95.13 एकूण 118.2 हेक्टर, इंदापूरमध्ये तृणधान्याचे 97 हेक्टर असून एकूण खरीपाचे क्षेत्र 118.2 हेक्टर आहे. दौंडमध्ये तृणधान्य 19.34 हेक्टर आणि 29.6 हेक्टरवर ऊस वगळता खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. पुरंदरमध्ये 64.5 हेक्टरवर तृणधान्याची पेरणी करण्यात आली असून 118.7 हेक्टरवर ऊस वगळता खरीपाची पेरणी झाली आहे.
दौंडमध्ये 2.4 हेक्टरवर ऊस लागवड
हवेली तालुक्यात 21.55 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली असून मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, शिरूरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली नाही. दौंडमध्ये अवघ्या 2.4 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे.