पिंपरी/शिक्रापूर । खेड पाठोपाठ आता शिरूर तालुक्यातही डमी आमदार असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर गाडी राष्ट्रवादीच्या एका माजी सरपंचाची आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात खेड तालुक्यात सापडलेल्या अशाच डमी आमदारांच्या गाड्यांना ज्या आमदाराने स्टिकर पुरविले होते. त्यानेच येथील गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, या स्टिकरप्रकरणी आमदार महेश लांगडे यांच्याकडे संशयाची सुई फिरल्याने त्यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्य अशा नावाने जे डमी आमदार गाडीवर स्टिकर लावत असतील त्यांचा आणि माझा कुठलाही संबंध नसून आपल्या तीन-चार गाड्यांशिवाय अन्य कुणालाही स्टिकर दिलेले नाहीत. बोगस स्टिकर लावून डमी आमदार म्हणून मिरविणारांवर तातडीने कारवाई करावी, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
शिरूरमधील सणसवाडी येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेल्या तीन गाड्या फिरत आहेत. या गाड्या राष्ट्रवादीशी संलग्न असलेल्या पदाधिकार्याच्या असल्याचे समजते. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिक्रापूरचे नवनिर्वाचीत पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. संशयास्पद गाड्यांची चौकशी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून असे स्टिकर असलेली एक महागडी गाडी फिरत असल्याचे नजरेस आले. ही गाडी सणसवाडीतील राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाची असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांची धावपळ झाली. याबाबत गिरिगोसावी यांनी सांगितले की, असला गंभीर प्रकार सहन केला जाणार नाही. संबंधितांवर कारवाई केलीच जाईल. ज्या आमदाराने स्टिकर पुरविले त्यांनी शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधून बाजू मांडल्याची चर्चा आहे.
शिक्रापूरमध्ये गुन्हा दाखल
विधानसभा सदस्य स्टिकर लावून फिरणार्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष भुजबळ यांचेवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत त्यांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले त्याचीही माहिती घेणे सुरू केले आहे. बेकायदा स्टिकर लावण्याचा पुणे शहर व जिल्ह्यातील पहिला गुन्हा असून असे बेकायदा स्टिकर पुरविणार्या आमदाराला हा धक्का समजला जात आहे. गाडी ताब्यात घेवून शिक्रापूर पोलिसांनी गाडीमालक भुजबळ यांचे नाव अधिक माहिती घेण्याच्या उद्देशाने जाहिर केलेले नव्हते. रात्री उशिरा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी तातडीने खुलासा केला व सांगितले की, गोरक्ष भुजबळ हे राष्ट्रवादीचे नाहीत. दरम्यान, ही बाब पालकमंत्री गिरीश बापट व शिरूर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी गंभीरपणे घ्यावी तसेच बेकायदा कुणालाही स्टिकर देणार्या आमदारांनाही जाब विचारावा तसेच त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
खेड पोलिसांची बोटचेपी भूमिका
गेल्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावून अनेक गाड्या फिरत होत्या. असे स्टिकर लावणे बेकायदेशीर असतानाही खेड पोलिसांनी याप्रकरणी हिंमत न दाखविता बोटचेपी भूमिका घेतली. शिरुर तालुक्यात अशा पध्दतीने गाडी (एमएच 11 एमएफ 0047) घेवून फिरत असल्याचे शिक्रापूरात निदर्शनास आले असता येथे नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बेकायदा स्टिकर लावून फिरणारे सणसवाडीतील माजी सरपंच गीता भुजबळ यांचे पती गोरक्ष भुजबळ यांच्यावर भारत सरकारचे राज्यचिन्ह (अयोग्य वापरास प्रबंध कायदा 2005 कलम 4 व 7) प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गरजेनुसार भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती गिरीगोसावी यांनी दिली.
स्टिकर लावणार्यांवर कारवाई करा
मी असे कुणालाही स्टिकर दिलेले नसून मी माझ्या तीन चार गाड्यांशिवाय अन्य कोणत्याही गाड्यांना असे स्टिकर कशाला लावेन. अर्थात मी माझा मतदारसंघ सोडून शिक्रापूर वा अन्य ठिकाणी कशाला स्टिकर वाटेन? एका आमदाराने आपल्या किती गाड्यांना स्टिकर लावावेत याबाबत स्पष्ट नियम नाहीत. मात्र गाडीत बसणार्या आमदारांकडे ओळखपत्र असते. तेच आमच्यासाठी महत्तवाचे असते. स्टिकर लावून कोणी डमी आमदार म्हणून कुणी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे.
– महेश लांडगे, आमदार